
बिहारच्या पाटणामध्ये इंडिगोच्या एअरपोर्टचे मॅनेजर रुपेश सिंह यांच्या हत्येनंतर नितीश कुमार सरकारवर टीका सुरू आहे. राज्यात गुन्हेगारी वाढल्यावरून सत्तेत असलेल्या भाजप-जेडीयूच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच संदर्भात मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रश्न विचारल्यानंतर ते पत्रकारांवर संतापले आणि ‘जंगल राज’ विसरले का असा सवाल देखील त्यांनी पत्रकारांना विचारला.
नितीश कुमार पत्रकारांना म्हणाले की, गुन्ह्या प्रकरणी कारवाई सुरू आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. रुपेश कुमार यांच्या हत्येचं दु:ख आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. नितीश कुमार असेही म्हणाले की, गुन्हेगार कुणाची परवानगी घेऊन अपराध करतात का?
संतापून ते म्हणाले ‘पत्रकारांनी असे प्रश्न विचारणे अत्यंत चुकीचे आहे. पोलिसांना निराश करू नये, कारण ते संपूर्णपणे काम करत आहेत. पत्रकारांना जर कळाले की हत्या कुणी केली आहे तर त्यांनी ते पोलिसांना सांगितले पाहिजे.’ पुढे बोलताना ते म्हणाले की, 2005 च्या आधी काय स्थिती होती? किती हिंसा आणि गुन्हे होत होते. आज तशी स्थिती आहे का? बिहार आज गुन्ह्यांच्या संदर्भात 23 व्या क्रमांकावर असल्याचेही ते म्हणाले.
तुम्ही कुणाचे समर्थक आहात? तसेच पती-पत्नीच्या काळात किती गुन्हे होत होते त्यावर कुणी प्रश्न विचारत नाही, असेही ते म्हणाले.




























































