
गेले वर्षभर असलेली कोरोनावरील लसीची प्रतिक्षा संपली असून उद्या दि.16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सकाळी 9 ते 5 यावेळेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 15 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीकरण होणार असून त्यामध्ये जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, उपजिल्हा रुग्णालय दापोली, उपजिल्हा रुग्णालय कामथे, ग्रामीण रुग्णालय गुहागर आणि ग्रामीण रुग्णालय राजापूर या पाच ठिकाणी 500 जणांना लस देण्यात येणार आहे.
उद्या प्रत्येक आरोग्य संस्थेतील 100 आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे. उपजिल्हा रुग्णालय दापोली, उपजिल्हा रुग्णालय कामथे, ग्रामीण रुग्णालय गुहागर आणि ग्रामीण रुग्णालय राजापूर या चार ठिकाणी 100 पेक्षा कमी संख्येने कर्मचारी असल्याने अनुक्रमे प्राथमिक आरोग्य केंद्र असूद, आडरे, आबलोली, धारतळे या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे. यामध्ये ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा असे दीर्घ आजार आहेत त्यांना ही लस सध्या दिली जाणार नाही.
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया पुणे या लस उत्पादक कंपनीने बनवलेल्या कोविशिल्ड या लसीचे 16330 डोसेस जिल्हा मुख्यालयाला उपलब्ध झाले आहे. ही लस स्नायूमध्ये दंडावर 0.5 मिली या प्रमाणात तसेच 28 दिवसांच्या अंतराने 2 डोसेस या प्रमाणात दिली जाणार आहे. दोन्ही डोस एकाच लस उत्पादक कंपनीने बनवलेल्या लसीचे दिले जाणार आहेत. लसीकरणासाठी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष अशा प्रकारे तीन कक्षांची रचना केली असून संपूर्ण लसीकरण प्रक्रिया 5 प्रक्षित सदस्यीय लसीकरण चमूद्वारे पार पाडली जाणार आहे. यामध्ये ज्यांची नोंदणी यापुर्वी झाली आहे त्यांनाच ही लस दिली जाणार आहे. लसीकरणाबाबतचा एसएमएस लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर येईल. या एसएमएसची खात्री केल्यानंतर लाभार्थ्याला प्रतिक्षा कक्ष आणि त्यानंतर लसीकरण केंद्रात प्रवेश दिला जाईल. लसीकरण कक्षामध्ये लाभार्थ्याने नोंदणीच्या वेळी दिलेल्या आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक इत्यादी ओळखपत्राची खात्री करुन कोविनअॅपमध्ये नोंद करुन लसीकरणासाठी पाठवण्यात येईल. लसीकरण झाल्यानंतर निरिक्षण कक्षामध्ये अर्ध्या तासासाठी निरिक्षणासाठी ठेवण्यात येईल. निरिक्षणादरम्यान लाभार्थ्याला लसीकरण पश्चात काही समस्या जसे खाज, चक्कर, उलटी इत्यादी उदभवल्यास त्यावर उपचार केले जातील. निरिक्षण कालावधीमध्ये वरीलप्रमाणे समस्या न उदभवल्यास लाभार्थ्याला पुढील डोसची तारीख सांगून कोवीड अनुरुप वर्तन म्हणजे मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे, 2 मीटरचे अंतर ठेवणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, चेहर्याला हात न लावणे इत्यादी गोष्टी पाळाव्या लागतील़. तसेच घरी गेल्यानंतर काही त्रास उदभवल्यास जवळच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका व वैद्यकिय अधिकार्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याच्या सूचना दिल्या जातील व आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करुन तज्ञांकडून पुढील उपचार केले जातील़. यानंतर प्राप्त झालेल्या शासननिर्देशानुसार अन्य लाभार्थ्यांसाठी लसीकरणाचे नियोजन करण्यात येईल.



























































