
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मेदरम्यान तर दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 31 मेदरम्यान घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
एसएससी (इ. १० वी) बोर्डाची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.#sscexams2021#sscexam pic.twitter.com/AXhFsbo9lf
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 21, 2021
सीबीएसईसह इतर केंद्रीय शिक्षण मंडळांनी आपल्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने दहावी-बारावीच्या परीक्षांची घोषणा केली. लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा पार पडणार असून 1 ते 22 एप्रिलदरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा तर 9 ते 28 एप्रिलदरम्यान दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे.
दोन महिन्यांत निकाल
परीक्षेनंतर पुढील दोन महिन्यांत निकाल जाहीर करण्यात येतील असेही वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. बारावीचा निकाल अंदाजे जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे.
परीक्षा घेताना राज्यातील स्थानिक स्तरावरील माहिती घेऊनच त्यासाठीचे नियोजन केले जाणार असून कोरोना आणि त्यासंदर्भातील सर्व खबरदारी घेतली जाणार आहे. या परीक्षांच्या कालावधीत एखादा विद्यार्थी क्वारंटाइन अथवा कोरोनामुळे परीक्षेला मुकला तर त्याच्या फेरपरीक्षेसंदर्भातही निर्णय घेतला जाईल. – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
राज्यातील 95 टक्के शाळा सुरू
राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्या असून 18 जानेवारीपर्यंत 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती नोंदवली गेली. राज्यातल्या 21 हजार 287 शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण 38.4 टक्के इतके आहे.
राज्यात ९ वी ते १२ वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढती. राज्यात २१ हजार २८७ शाळा सुरू. एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेऊन शाळा सुरु. १८ जानेवारीला २१ लाख ६६ हजार ५६ विद्यार्थी (सुमारे ७६.८ टक्के) उपस्थित- शालेय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad pic.twitter.com/EzAtuFkR1D
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 21, 2021





























































