
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहतूकही बंद करण्यात आली होती. याचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणे रेल्वेलाही बसला आहे. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घ्यायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर ब्युटी सलॉन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे चेहऱ्याची रंगरंगोटी करण्यापासून हजामत करण्यापर्यंत सगळी कामं आता तुम्हाला रेल्वेस्थानकावरच करता येणं शक्य होणार आहे.
ही ब्युटी पार्लर किंवा सलॉन ही युनिसेक्स म्हणजेच पुरुष आणि महिला दोघांसाठी असणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील निवडक स्थानकांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सलॉनमध्ये केस कापण्यापासून हेअर स्टाईल करण्यापर्यंत विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. ज्या स्थानकांवर ही ब्युटी सलॉन सुरू करण्याचं ठरवण्यात आलं आहे त्यामध्ये मुंबई सेंट्रल, अंधेरी,गोरेगाव, कांदिवली आणि बोरीवली या स्थानकांचा समावेश आहे. स्थानकावरील सलॉन चालवण्यास इच्छुक असलेल्यांना 250 स्वेअर फीट एवढी जागा देण्यात येणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत प्रवाशांना लाभ घेता येणार आहे.टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी अशाप्रकारे केलेला हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. या प्रयोगाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास पश्चिम रेल्वेचे पीआर सुमीत ठाकुर यांनी व्यक्त केला आहे. सलॉनशिवाय रेल्वे प्रवाशांना त्यांचे सामान सुरक्षित ठेवता यावे यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करत डिजिटल लॉकरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी आणि दादर स्टेशन या स्थानकांवरील क्लॉकरुममध्येही डिजिलॉकर ठेवण्यात येणार आहेत. हे लॉकर नवीन तंत्रज्ञानाच्या प्रणालीने बनवण्यात आले असून त्यामध्ये सामान ठेवल्यानंतर प्रवाशाला ऑनलाईन रिसीट मिळणार आहे. सामान पुन्हा मिळवायचे असल्यास रिसीटवरील त्याच्यावर असलेला कोड स्कॅन करुनलॉक उघडता येईल आणि प्रवाशाला त्याचे सामान परत मिळवता येईल.



























































