जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… अशी खणखणीत साद पुन्हा एकदा घुमली… दक्षिण मुंबईतील रिगल सिनेमासमोरील वाहतूक बेटावर… खरे तर ही शिवसेनेच्या आंदोलनांची रणभूमीच… आज याच रणभूमीवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जणू अवतरले…

‘शिवसेना झिंदाबाद’, ‘बाळासाहेब ठाकरे अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. अलौकिक, अद्भुत आणि अचंबित करणारी शिल्पकला पाहून प्रत्येक जण गहिवरला. चेहऱयावरील तेच करारी भाव आणि दोन्ही हात उंचावून समोरच्या अफाट जनसागराला साद घालणारी  प्रत्येक हिंदूच्या हृदयात कोरली गेलेली तीच पोझ… मूर्तिमंत बाळासाहेबच! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सायंकाळी शिवसेनाप्रमुखांच्या या भव्य पूर्णाकृती पुतळय़ाचे दिमाखदार लोकार्पण झाले, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.  

यावेळी शिवसेनाप्रमुखांचा हुबेहुब पुतळा साकारणारे शशिकांत वडके, वास्तुविशारद रोहन चव्हाण, सल्लागार भूपेन रामनाथकर, अभियंता प्रदीप वडके यांचा  सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिमोटचे बटन दाबताच मखमली भगवा पडदा दूर झाला आणि भगव्या प्रकाशझोतात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हात उंचावून जनतेला साद घालणारा भव्य पुतळा प्रकट झाला. भगवामय वातावरणात शिवतीर्थावरील सभेची आठवण करून देणाऱया त्या क्षणाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्यासह सौ. रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, खासदार अरविंद सावंत, मनसेचे नेते अमित ठाकरे प्रबोधन प्रकाशन प्रा. लि. चे संचालक विवेक कदम आणि संजय वाडेकर, सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्रविणा मोरजकर, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, आमदार संजय पोतनीस, अजय चौधरी, मंगेश कुडाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिवसेना सचिव,  आदेश बांदेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले..

मूर्तिकार शशिकांत वडके यांना अश्रू अनावर

मूर्तिकार शशिकांत वडके यांना  यावेळी  अश्रू अनावर झाले. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनी त्यांना गहिवरून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वडके यांच्या मूर्तिकलेचे खास कौतुक केले.

आसमंत दुमदुमला, फोर्ट परिसरात नवचैतन्य!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाल्यामुळे संपूर्ण फोर्ट परिसरात नवचैतन्य संचारले. या सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात ठीकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते. तसेच बाळासाहेबांच्या जाज्वल्य विचारांचे कटआऊट टप्प्याटप्प्यावर लावण्यात आले होते. आपल्या लाडक्या नेत्याला डोळ्यादेखत पाहण्याची संधी मिळाल्याची भावना व्यक्त होत होती. त्यामुळे पुतळा समोर दिसताच ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. बाळासाहेबांची आठवण झाली. ‘चेहऱयावर हसू आणि डोळ्यात आसू’ अशी स्थिती झाल्याची भावना महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.  

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती. त्यानिमित्त दक्षिण मुंबईत उभारण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या भव्य पुतळय़ाचे आज अनावरण करण्यात आले. शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा असून त्याची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे.

ऐतिहासिक क्षण!  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आजचा हा ऐतिहासिक क्षण आहे. आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असून या क्षणी बोलण्यास शब्द अपुरे पडत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या देशाचे मोठे नेते आणि मार्गदर्शक होते. त्यांचे विचार आज आणि उद्यादेखील आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत, शिवसेनाप्रमुखांचे कारकीर्दीत अनेक नेत्यांशी ऋणानुबंध होते. त्यामुळेच सर्वपक्षीय दिग्गज नेते पक्षीय उंबरठे ओलांडून आज एकत्र आले यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.