हँकॉक पूल ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार, गर्डरच्या वाढीव कामामुळे खर्च वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या भायखळा व सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाचे काम ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे. गर्डरच्या वाढीव कामामुळे बांधकाम कालावधी 15 महिन्यांनी वाढला असून  कामाचा खर्च 1 कोटी 37 लाखांनी वाढला आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर परिसरातील पादचारी आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

हँकॉक पूल धोकादायक ठरल्याने मुंबई महानगरपालिकेने हा पूल तोडून ऑक्टोबर 2018 मध्ये या पुलाचे नव्याने बांधकाम सुरू केले. मे. साई प्रोजेक्टस (मुंबई) प्रा. लि. ने पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. मात्र, हा पूल रेल्वे हद्दीतून जात असल्यामुळे रेल्वे हद्दीतील काम हे रेल्वेच्या नियम आणि मानांकानुसार करण्यासाठी रेल्वे प्राधीकरणाने शिफारस केलेल्या मे. राईट्स लिमिटेड या कंपनीची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, हे काम सुरू झाल्यानंतर रेल्वेच्या अंतिम आराखडय़ात बदल करण्यात आल्याने हे काम 15 महिन्यांनी लांबले आहे. पालिकेने राईट्स लिमिटेड या कंपनीला या आधी 1 कोटी 80 लाख रुपये शुल्क देण्यात आले आहे. पुलाच्या बांधकाम आराखडयात बदल झाल्याने गर्डरचे काम वाढल्याने आता आणखी 1कोटी 37 लाख 52 हजार वाढीव द्यावे लागणार आहेत.