
विलेपार्ले येथील नामांकित पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालयाचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष आहे. शतकमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांनी शाळांच्या एकात्मकतेचे प्रतीक म्हणून ‘ज्ञानफुलोरा’ कलाकृती साकारली. 100 प्रकारची सुमारे 5 हजार नैसर्गिक फुले आणि 800 रोपांचा वापर करून शतक महोत्सवी वर्ष सूचित करणारी ही भव्य रचना तयार करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मराठी शाळेच्या मैदानात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्प खोचून अभिनव पद्धतीने ‘ज्ञानफुलोरा’चे उद्घाटन करण्यात आले. यावर्षी संचलनासाठी मुले शाळेत येऊ शकली नाहीत म्हणून संस्थेच्या पाचही शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी ध्वजवंदन करून संचलन केले.
शाळांमध्ये फुलबागा तयार करणार
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संचालक मंडळातील सुमारे 300 जणांनी पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने दिलेली ’हरित शपथ’ घेतली. ज्ञानफुलोरातील रोपे वापरून संस्थेच्या पाचही शाळांमध्ये फुलबागा तयार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. विद्यार्थी जेव्हा पुन्हा शाळेत येतील या फुलबागांमध्ये त्यांचे स्वागत करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे सहकार्यवाह हेमंत भाटवडेकर यांनी दिली.




























































