
केसगळती आणि त्यामुळे पडणारं टक्कल ही अनेकांसाठी त्रासदायक गोष्ट आहे. टक्कल पडण्यासाठी मानसिक तणाव, आहार, स्वच्छता अशी वेगवेगळी कारणं असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेलेले केस पुन्हा आणणं हे भयंकर कठीण आणि कधीकधी अशक्य होऊन जातं. पण, शास्त्रज्ञांनी याच्यावर उत्तर शोधलं आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, थायलंडच्या शास्त्रज्ञांनी टकलावर उपाय शोधल्याचा दावा केला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार हा उपाय जवळपास 50 लोकांवर करून पाहिला. त्यांना केस गळणे, तुटणे, टक्कल पडणे अशा समस्या होत्या. विशेष म्हणजे या 50 लोकांवर केलेल्या या चाचणीला यश मिळालं आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
हे औषध कांदळवन वृक्षाच्या अर्कापासून तयार करण्यात आलं. या अर्काला शास्त्रीय भाषेत एविसेनिया मारिन असं म्हणतात. एविसेक्किनन-सी नावाचं एक रसायन या अर्कात असतं. या रसायनमुळे केस तुटणे, गळणे या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. तसच टक्कल पडल्याने बदलणाऱ्या हार्मोन्सनाही ते नियंत्रित करतं.
थायलंडच्या चुललॉंगकोर्न या विद्यापीठात हे शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून या रसायनावर संशोधन करत आहेत. या संशोधनादरम्यान त्यांनी टक्कल पडलेल्या 50 स्त्री पुरषांवर या अर्काचा प्रयोग केला. या अर्कापासून बनवलेला लेप दररोज आपल्या डोक्यावर लावण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं. विशेष म्हणजे त्यांच्या डोक्यावर पुन्हा केस दिसू लागले.
त्यावरून शास्त्रज्ञांनी या अर्काचा उपयोग केसगळती रोखण्यासाठीच नव्हे तर केसांच्या वाढीसाठीही उपयुक्त असल्याचं शोधून काढलं आहे. सध्या या औषधांचं पेटंट तयार करण्यात आलं असून काही काळानंतर हे औषध बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.




























































