नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी गजाआड, 48 देशांतील तरुणांचा तपशील या टोळीकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशात नोकरीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱया नायजेरियन टोळीच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ओजुनसाकीन ऊर्फ मायकेल ओलायेनी, सोटोमिवा थॉम्सन, ओपेयेमी ओडेले ओगुन्मोरटी आणि ऑगस्टीन फ्रान्सिस विल्यम अशी चौघांची नावे असून या टोळीने आतापर्यंत फसवणुकीतून मिळालेल्या पैशापैकी 10 कोटी रुपये नायजेरिया येथील एका बँक खात्यात वळते केले आहेत.

तक्रारदार तरुण हा चेंबूर येथे राहत असून त्याला परदेशात नोकरी करायची होती. त्याने नोकरीसाठी काही वेबसाइटवर नाव नोंदवले होते. त्याला गेल्या वर्षी हिल्टन हॉटेलमध्ये नोकरीची जाहिरात दिसली होती. त्याने जाहिरातीमध्ये दिलेल्या ई-मेलवर त्याची वैयक्तिक माहिती दिली. त्यानंतर तरुणाला हॉटेलमध्ये मॅनेजर पदासाठी नियुक्ती झाल्याचा ई-मेल आला. विश्वास बसावा म्हणून त्याला नोकरीचे नियुक्ती पत्र पाठवून व्हिसा, प्रोगॅम, एम्लॉयमेंट ऑथरायझेशन, बेसिक ट्रव्हलिंग अलाऊन्स फी भरण्यास भाग पाडले. नोकरी मिळणार या आशेने त्याने 17 लाख रुपये बँक खात्यात भरले. पैसे भरूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मिलिंद भारंबे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, सहायक पोलीस आयुक्त नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनखाली प्रभारी निरीक्षक एस. सहस्रबुद्धे, उपनिरीक्षक पाटील, यशवंतराव, सावंत, जाधव, पिसाळ, तावडे, ननावरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी कौशल्याचा वापर करून त्या चौघांची माहिती काढली. त्या चौघांना पुण्यातून अटक केली. अटक केलेल्यामध्ये दोघे हे स्टुडंट व्हिसा तर एकाच्या व्हिसाची मुदत संपली असून अन्य एकाचा व्हिसाच नसल्याचे तपासात समोर आले आहे.

27 हजार जणांचा डेटा

पोलिसांनी घटनास्थळाहून चौदा फोन, चार लॅपटॉप आणि तीन मेमरी कार्ड जप्त केले आहेत. या टोळीकडे आतापर्यंत गेल्या आठ महिन्यांतील 27 हजार नागिरकांचा डेटा आढळून आला असून त्याने आतापर्यंत दोन हजार जणांना फोन केल्याचा अंदाज आहे. तर अडीच हजार तरुणांचा पासपोर्टचा डेटादेखील या टोळीकडे असून 48 देशांतील तरुणांची माहिती या टोळीकडे होती.

दुबई व्हाया नायजेरिया

या टोळीने फसवणुकीसाठी हिंदुस्थानातील 12 बँकांत 64 खाती उघडली असून महाराष्ट्र, दिल्ली, कोलकाता, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम राज्यातील अनेक तरुणांनी नोकरीसाठी पैसे जमा केलेले त्या खात्यात वळते झाले होते. पोलिसांनी 11 बँक खात्याची माहिती काढली असून जमा झालेले पैसे गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक खाते दुबई येथील असून नायजेरियामधील खात्यात 10 कोटी रुपये वळते झाले आहेत.