उमेद – सलाम विश्वविक्रमी भरारीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कॅप्टन नीलेश गायकवाड

‘जीतता वोही है, जिसके हौसलों में दम है…’ असे म्हटले जाते. इतिहासकाळापासून आधुनिक काळापर्यंत विजयासाठीची ही ऊर्मी, उमेद, साहस, संयम, धैर्य महिलांनी अनेकदा दाखवले आहे. याचा पुनःप्रत्यय अलीकडेच एअर इंडियाच्या महिला वैमानिकांच्या विश्वविक्रमाने आला आहे. बोइंग-777 या विमानातून उत्तर ध्रुवावरून उड्डाण करून जगातील सर्वाधिक लांबीचा म्हणजेच 16 हजार किमीचा सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू हवाई प्रवास करत या रागिणींनी आपल्या कर्तृत्त्वाची ओळख जगाला करून दिली आहे.

ऑल विमेन कॉकपिट क्रू’ म्हणजेच विमानाच्या कॉकपिटमध्ये सर्व महिला कर्मचारी नियुक्त करून सर्वात मोठा प्रवास करण्याचा विक्रम हिंदुस्थान महिला वैमानिकांनी नोंदविला आहे. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथून उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान सर्वात मोठा एअर रूट पार करून बंगळुरू विमानतळावर सुखरूप उतरले. कॅप्टन झोया अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी ही कामगिरी फत्ते करण्यासाठी निघाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी सर्वप्रथम दिली आणि विमान बेंगळुरूला येण्याची प्रतीक्षा सर्व देशवासीय करू लागले.

या उड्डाणातील सर्वात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा म्हणजे, विमान उत्तर ध्रुवावरून उड्डाण करणार होते. या विमानाने एकूण 14 हजार किलोमीटरचा प्रवास केला. कॅप्टन थनमई पापागारी, कॅप्टन आकांक्षा सोनावणे आणि कॅप्टन शिवानी मनहास यांनी कॅप्टन झोया अग्रवाल यांच्यासोबत उड्डाण केले.

सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानतळावर सजावट करून उत्सवी वातावरण निर्माण करण्यात आले होते. हिंदुस्थानी महिला वैमानिक एक मोठा विक्रम करण्यासाठी निघाल्या आहेत, हे विमानतळावर उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांना यामुळे समजले होते. या उड्डाणाची खासीयत अशी की, उत्तर ध्रुवावरून यापूर्वीही उड्डाण करण्यात आले असले तरी सर्वच्या सर्व महिला कॉकपिट कर्मचाऱ्यांसह असे कधीच झालेले नव्हते. शिवाय आणखी एक खासीयत म्हणजे अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली’पासून हिंदुस्थानातील ‘सिलिकॉन व्हॅली’पर्यंत म्हणजे बंगळुरूपर्यंत हे उड्डाण होते.

झोया यांच्या मते, लांब पल्ल्याची उड्डाणे महिला वैमानिक नेहमीच करतात. अटलांटिक महासागरावरून जाणे आणि तेथूनच परत येणे किंवा जाताना प्रशांत महासागरावरून जाणे आणि येताना अटलांटिक महासागरावरून परतणे असे अनेकदा करावे लागते. अशा प्रकारच्या उड्डाणां वेळी अनेकदा बदल करावे लागत असतात, परंतु उत्तर ध्रुवावरून प्रवास करणे ही विशेष गोष्ट आहे.

‘उत्तर ध्रुव कुणाला पाहायलाही मिळत नाही, पण मी या ध्रुवावरून उड्डाण करणार, हे खूप भाग्याचे आहे’ असे झोया यांनी सांगितले होते. हे सलग सतरा तासांचे उड्डाण होते आणि या प्रवासादरम्यान कुठेही थांबायचे नव्हते. जगातील सर्वात मोठय़ा हवाई रूटपैकी हा एक रूट असला तरी त्यासाठी इतर रूटच्या मानाने इंधन कमी लागेल, असा अंदाज झोया यांनी उड्डाणापूर्वी व्यक्त केला होता. एअर इंडियाने या ऐतिहासिक उड्डाणासाठी बोइंग 777-200 एलआर या जातीच्या विमानाचा वापर केला.

या विश्वविक्रमी मोहिमेमधील कॅप्टन आकांक्षा सोनावणे या महाराष्ट्राच्या सुकन्या आहेत. मोहिमेनंतर वांद्रे येथील निवासस्थानी परतल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणतात, ‘‘वैमानिक महिला असो वा पुरुष, काम हे काम असते. माझ्यावर कंपनीने विश्वास ठेवला आणि मी मिळालेल्या संधीचे सोने केले. हा माझा नव्हे तर एअर इंडियाचा विजय आहे.’’ सांघिक यशामध्ये अहंला थारा न ठेवणे, हे एक गुणवैशिष्ट असते. विक्रमी गगनभरारी घेणाऱया या सर्व तरुणींकडे आहे हे विशेषत्त्वाने लक्षात घ्यायला हवे.

कॅप्टन झोया अग्रवाल या खूप अनुभवी वैमानिक असून 8000 तासांहून अधिक काळ विमानोड्डाण करण्याचा अनुभव त्यांना आहे. कमांडर या नात्याने बोइंग-777 विमानाच्या उड्डाणाचा अनुभव त्यांना दहा वर्षांपेक्षा अधिक काळ आहे. या विमानाच्या माध्यमातून त्यांनी सुमारे 2500 तास उड्डाण केले आहे. त्यांनी जेव्हा एअर इंडियामध्ये प्रवेश केला तेव्हा अगदी मोजक्या महिला वैमानिकांपैकी त्या एक होत्या. महिला वैमानिकांकडे सगळे लोक आश्चर्याने पाहत असत. कारण विमानोड्डाण हे पुरुषांचे वर्चस्व असणारे क्षेत्र मानले गेले आहे.

उत्तर ध्रुवावरून उड्डाण करणे अत्यंत जोखमीचे आणि आव्हानात्मक असते. एअर लाइन कंपन्या या मार्गावरून आपल्याकडील सर्वश्रेष्ठ आणि अनुभवी वैमानिकांनाच पाठवितात. येथून उड्डाण करताना बऱयाच तांत्रिक बाबी एकाच वेळी सांभाळाव्या लागतात. या ठिकाणी कम्पास (दिशादर्शक यंत्र) 180 अंशांनी फिरते. हा अनुभव अत्यंत रोमांचक असतो आणि तेवढाच आव्हानात्मकही असतो. सर्वात कमी वयात बोइंग-777 विमानाचे उड्डाण करणाऱया झोया या सर्वात कमी वयाच्या वैमानिक आहेत. तसेच उत्तर ध्रुवावरून उड्डाण करणाऱ्या विमानाचे कप्तान पद भूषविणाऱया एअर इंडियाच्या पहिल्या कमांडर आहेत.

सॅन फ्रान्सिस्को आणि बेंगळुरू ही दोन्ही ठिकाणे जगातील ‘टेक्नॉलॉजी हब’ म्हणून ओळखली जातात. या दोन्ही शहरांदरम्यान थेट (विनाथांबा) विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना खूपच फायदे मिळणार आहेत. बंगळुरू आणि सॅन फ्रान्सिस्को या दोन शहरांमधील हवाई अंतर 13 हजार 993 किलोमीटर एवढे प्रचंड आहे.

एअर इंडियामार्फत संचालित होणारे हे उड्डाण जगातील सर्वाधिक लांबीचा प्रवास करणारे पहिले उड्डाण ठरले आहे. अशी ही बहुउपयोगी, बहुउद्देशीय विमानसेवा सर्वप्रथम संचालित करण्याचा बहुमान महिला वैमानिकांच्या चमूला मिळाला ही हिंदुस्थानच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपासून हिंदुस्थानपर्यंतचा हा पहिला विनाथांबा मार्ग असेल. सॅन फ्रान्सिस्को ते बेंगळुरू या किफायतशीर, परंतु आव्हानात्मक मार्गावरून सर्वप्रथम प्रवास करणाऱया कॅप्टन झोया आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला वैमानिकांचे मनःपूर्वक अभिनंदन!