
ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन मोटारींमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघेजण ठार झाले असून सहाजण जखमी झाले आहेत. हा अपघात आज संध्याकाळी सातच्या सुमारास कराड जवळील नारायणवाडी गावच्या हद्दीत घडला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यामध्ये पुण्यातील कात्रज परिसरात राहणाऱ्या तिघांचा समावेश आहे.
स्वप्नील चंद्रकांत शिंदे आणि राहुल प्रल्हाद दोरगे आणि बाळासाहेब कांबळे (सर्व रा. कात्रज, पुणे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर गणेश काळे (वय २८ ), बाळासाहेब गदळे (वय३१ ), तुषार गावडे यांच्यासह अन्य पाच ते सहाजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांसह राज्य महामार्ग पोलिसांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही मोटारी रस्त्याकडेच्या नाल्यातून बाजूच्या झाडांवर जावून धडकल्या आहेत.
पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूरकडुन पुण्याकडे इनोव्हा आणि स्वीफ्ट कारमधून काहीजण निघाले होते. दोन्ही मोटारी कराड तालुक्याच्या नारायणवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही मोटारी रस्त्याच्या बाजूल असलेल्या झाडावर जाऊन आदळल्या. त्यामुळे तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा ते सात जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना त्वरीत कराड येथील रुग्णालयात दाखल केले.
अपघातातील सर्व जखमी पुणे शहर आणि जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी रात्री उशीरापर्यत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
मृत्युमुखी पडलेले सर्व पैलवान
अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेही पैलवान असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते सर्व कात्रज परिसरात राहत होते. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच पुण्यातील त्यांचे नातेवाईक तातडीने कराडकडे रवाना झाले आहेत.
































































