
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी 11 जानेवारीच्या व्यवस्थापन परिषदेत आक्षेप घेतलेला प्रस्ताव कुलगुरूंनी मंजुरीसाठी पुन्हा व्यवस्थापन परिषदेसमोर आणला आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 8 फेब्रुवारीला व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार असून या बैठकीत विद्यापीठातील विकासकामांसाठी सल्लागार म्हणून ‘आयआयएफसीएल’ या कंपनीचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुचविलेला प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारच्या व्यवस्थापन परिषदेत विद्यापीठविरुद्ध सिनेट सदस्य अशी खडाजंगी पाहायला मिळणार आहे.
विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये काही विकासकामे प्रस्तावित असून या कामांच्या देखरेखीसाठी आयआयएफसीएल कंपनीची नेमणूक करावी, असे राज्यपालांचे शिफारस पत्र आणि प्रस्ताव 11 जानेवारीच्या व्यवस्थापन परिषदेत ठेवण्यात आला. कार्यसूचीत समावेश नसलेला हा विषय परिषदेत येताच युवासेना सिनेट सदस्यांसह अन्य सिनेट सदस्यांनीही त्याला विरोध केला. कालिना कॅम्पसचा विकास करण्याकरिता मुंबई विद्यापीठाचे वास्तुविशारद, अभियंते असताना केंद्रातील कंपनीची शिफारस राज्यपालांनी का केली, असा सवाल त्या वेळी उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे राज्यपालांनी सुचवलेला प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की कुलगुरूंवर ओढावली होती, मात्र येत्या सोमवारी होणाऱया व्यवस्थापन परिषदेच्या वेळी राज्यपालांच्या या प्रस्तावावरून पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
…तर विद्यापीठावर प्रशासक नेमावा
विद्यापीठातील शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांबरोबरच विकासकामांची जबाबदारीही कुलगुरूंवर असते. कुलगुरूंना या कामासाठी बाहेरील कंपनीची मदत हवी असल्यास त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली. तसेच विद्यापीठातील विकासकामे पार पाडण्यासाठी राज्य सरकारने प्रशासकाची नेमणूक करावी, असेही प्रदीप सावंत यांनी सांगितले.
टेनिस कोर्टचा मालमत्ता कर विद्यापीठाच्या खिशातून
मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस येथील टेनिस कोर्टात गुरे चारली जात असल्याचे समोर आले होते. या जागेचा विद्यापीठाला काहीही उपयोग होत नाही, मात्र या जागेचा मालमत्ता कर विद्यापीठाच्या खिशातून जातो. 2016 मध्ये विद्यापीठाने या जागेसाठी तब्बल दीड कोटी रुपये मालमत्ता कर भरला आहे, असे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. या जागेची युवासेना सिनेट सदस्यांनी पाहणी केल्यानंतर या ठिकाणी गुराखी गुरांना घेऊन येत असल्याचे उघड झाले होते.




























































