
कोरोनाच्या प्रादुर्भावात दहावी, बारावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सुरू केलेल्या हेल्पलाइनवर शिक्षकांच्या प्रश्नांचा पाऊस पडत आहे. मुंबईतील दहावी, बारावीचे अनेक विद्यार्थी अजूनही शाळेच्या संपर्कात नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षक चिंतातूर झाले असून या विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज कसा भरायचा, त्यांचे वर्ष वाचविण्यासाठी काय करता येईल, त्यांच्याशी संपर्क कसा साधता येईल, अशी विचारणा शिक्षक एससीईआरटीने नेमलेल्या समुपदेशकांकडे करीत आहेत.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी एससीईआरटीच्या वतीने राज्यभर 426 समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये व त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. मात्र या समुपदेशकांकडे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही संपर्क साधत आहेत. दहावी, बारावीचा परीक्षा अर्ज भरण्यासाठी अजूनही काही शाळांमधील विद्यार्थी संपका&त नाही ही शिक्षकांसमोरील मोठी समस्या आहे. परीक्षा अर्ज न भरल्याने या विद्यार्थ्यांत वर्ष वाया जाण्याची भीती शिक्षक व्यक्त करीत आहेत.
कमी कालावधीत जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल, परीक्षेला कसे सामोरे जाल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. परीक्षेच्या आधी आणि नंतरच्या काळात विद्यार्थ्यांना मार्ददर्शन करण्याची जबाबदारी समुपदेशकांवर आहे. पण विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकही परीक्षेशी संबंधित विविध समस्या सोडविण्यासाठी संपर्क साधत आहेत. – मुरलीधर मोरे, समुपदेशक, मुंबई
यंदा कृतिपत्रिकेचा आराखडा कसा असेल?
दहावी, बारावीच्या भाषा विषयांसाठी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका देण्यात येत आहे. पण यंदा अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केल्याने कृतिपत्रिकेचा आराखडा बदलण्यात आला आहे का, अशी विचारणा शिक्षक करीत आहेत. तसेच यंदा तोंडी परीक्षा ऑनलाइन घेणार का, कोरोनामुळे परीक्षा पद्धतीत बदल केला आहे का, पेपर पॅटर्न कसा असेल, तपासणीसाठी उत्तरपत्रिका कधी उपलब्ध होतील याबाबतची विचारणाही शिक्षक समुपदेशकांकडे करीत आहेत.
































































