
प्रभू रामचंद्र हे फक्त तुमचे नाहीत. ते संपूर्ण जगाचे आहेत. देव आणि अल्लाहमध्ये फरक केला जाऊ शकत नाही. देव आणि अल्लाह एकच आहेत. या दोघांमध्ये फरक केलात तर देश तुटेल, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी मंगळवारी मोदी सरकारला सुनावले. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सादर केलेल्या आभार प्रस्तावावरील चर्चेत अब्दुल्ला यांनी सहभाग घेतला. डॉक्टर जसे रक्ताच्या बाटलीकडे पाहून ही बाटली हिंदुच्या रक्ताची किंवा मुस्लिमाच्या रक्ताची अशी वर्गवारी कधीच करू शकत नाही. तसेच देवाने सर्वांना समान बनवले आहे. प्रभू रामचंद्र केवळ तुमचेच नाहीत तर आमचेही आहेत. सगळ्या जगाचे आहेत. तसेच कुराणही केवळ आमच्यापुरते मर्यादित नाही, अशा शब्दांत अब्दुल्लांनी फटकेबाजी केली. या वेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. आज तुम्ही आम्हाला पाकिस्तानी-खलिस्तानी म्हणताय. परंतु मला जगायचे आणि मरायचे इथेच आहे. मी कोणालाही घाबरत नाही, असा इशारा अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला दिला.
कृषी कायदे म्हणजे धर्मग्रंथ नाहीत
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यावरून सध्या देशभर गदारोळ उडाला आहे. शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. हे कायदे बदलण्यासाठी सरकारने लवचिकता स्वीकारायला हवी, हे कायदे न बदलायला ते काही धार्मिक ग्रंथ नाहीत, अशा शब्दांत अब्दुल्लांनी सरकारचे कान टोचले. आपण इथे तोडगा काढण्यासाठी आलोय, अडथळे निर्माण करण्यासाठी नाही, असेही त्यांनी सुनावले.
























































