
बुधवारी वर्सोवा परिसरात गॅस सिलिंडरच्या गोदामाला लागलेल्या आगप्रकरणी गोदाम मालक वाडीलाल गडाला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंधेरीच्या वर्सोवा-यारी रोड परिसरात वाडीलाल यांचे गॅसचे गोदाम असून त्यात लहान-मोठे गॅसचे सिलिंडर ठेवले जातात. बुधवारी सकाळी गोदामात कर्मचारी काम करत असताना अचानक आग लागली. आगीची माहिती समजताच वर्सोवा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले.
काही तासानंतर आग विझली. गोदामाला आग लागल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गोदामाचा मालक वाडीलाल गडाला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. या आगीच्या घटनेचा पुढील तपास वर्सोवा पोलीस करत आहेत.

























































