
मुंबई महापालिकेने 16 जानेवारीपासून सुरू केलेल्या लसीकरणाचा पहिला आणि दुसरा टप्पा वेगाने सुरू असून आता खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी मिळणार आहे. याची सुरुवात येत्या सोमवारपासून होणार असून 20 खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱयांना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत कोरोना लसीकरणाच्या तिसऱया टप्प्यापासून सर्वसामान्यांचे लसीकरण सुरू होणार आहे. तिसऱया टप्प्यात 50 वर्षांवरील ज्येष्ठ आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात यंत्रणा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यामुळे येत्या सोमवारपासून खासगी रुग्णालयांना सुरुवातीला फक्त त्यांच्या कर्मचाऱयांचे लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली. 1 मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
खासगी रुग्णालयांना पालिका लस पुरवणार
कर्मचाऱयांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांना मुंबई महापालिकाच लस पुरवणार आहे. या लसी सिरम इन्स्टिटय़ूटकडून राज्य सरकार आणि महापालिकेला मोफत मिळाल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांनाही या लसी पालिका मोफत देणार आहे. मात्र लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि यंत्रणा या रुग्णालयांनी स्वतः उभ्या करायच्या आहेत, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.



























































