नदालचे स्वप्न भंग, ग्रीसच्या सितसिपासचा रोमहर्षक विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रफाएल नदालचे 21व्या विक्रमी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवण्याचे स्वप्न बुधवारी भंग पावले. 22 वर्षीय ग्रीसच्या स्टेफनोस सितसिपास याने रफाएल नदालचे कडवे आव्हान 3-6, 2-6, 7-6, 6-4, 7-5 अशा पाच सेटमध्ये मोडून काढत पुरुषांच्या एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली. स्टेफनोस सितसिपास याने चार तास व पाच मिनिटांमध्ये हा रोमहर्षक विजय मिळवला हे विशेष.

मित्राला हरवत अंतिम चारमध्ये

रशियाच्या डॅनील मेदवेदेव याने रशियाचाच आपला मित्र आंद्रे रूबलेव याला पराभूत करीत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. डॅनील मेदवेदेव याने ही लढत 7-5, 6-3, 6-2 अशा फरकाने जिंकत पुढे पाऊल टाकले. ही लढत दोन तास व पाच मिनिटे रंगली.

मुचोवाकडून बार्टीला धक्का

या स्पर्धेत महिला एकेरीत धक्कादायक निकाल बघायला मिळाला. फ्रेंच ओपनची विजेती आणि अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टी हिला उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. 27व्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या पॅरोलीना मुचोवा हिने तिला 1-6, 6-3, 6-2 असे पराभूत करत उपांत्य फेरीत धडक दिली. पॅरोलीना कारकिर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. जेनिफर ब्रॅडीने जेसिका पेगुला हिला 4-6, 6-2, 6-1 असे हरवत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.