कौशल्य पाहूनच अर्जुनला संघात घेतले! मुंबई इंडियन्सचा कोच महेला जयवर्धनेचे उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला गुरुवारी झालेल्या आयपीएल लिलावात 20 लाखांच्या बेसप्राईजवर मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले. स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये जास्त सामने न खेळलेल्या अर्जुन तेंडुलकरला आयपीएलच्या लिलावात स्थान देण्यात आले तसेच त्यानंतर मुंबई इंडियन्सनेही त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. यावरून सोशल साइटवर टीका होऊ लागली. मात्र मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक स्टाफकडून अर्जुन तेंडुलकरच्या निवडीची पाठराखण केली. कोच महेला जयवर्धने यावेळी म्हणाला, सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूचे नाव अर्जुनसोबत जोडले असल्यामुळे त्याच्यावर नक्कीच दडपण असेल, पण अर्जुनचे कौशल्य पाहूनच आम्ही त्याला संघात घेतले आहे.

ब्ल्यू गोल्ड जर्सी घालण्यासाठी उत्सुक
अर्जुन तेंडुलकरने यावेळी मुंबई इंडियन्सचे संघ मालक, कोच व सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानले. यावेळी तो म्हणाला, मी लहानपणापासूनच मुंबई इंडियन्सचा फॅन आहे. आता याच संघामधून खेळायला मिळणार आहे. मुंबई पलटणमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज असून ब्ल्यू गोल्ड जर्सी घालून मैदानात उतरण्यासाठीही उत्सुक आहे.

दोन वर्षे नेटमध्ये सराव
महेला जयवर्धने पुढे म्हणाला, अर्जुन तेंडुलकरने गेल्या दोन वर्षांमध्ये नेटमध्ये कसून सराव केला आहे. यूएईत पार पडलेल्या आयपीएलमध्येही त्याने प्रचंड मेहनत केली. मुंबईच्या सीनियर संघामधूनही तो खेळला आहे. आता फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये तो खेळणार आहे. त्याचे शिकण्याचे वय आहे. आम्ही त्याला मार्गदर्शन करणार आहोत, असेही महेला जयवर्धने यावेळी आवर्जून म्हणाला.