
वरळीत पालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यात येणार असून या ठिकाणी परदेशातूनही लाइव्ह अंत्यदर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे. पालिकेच्या रमाई आंबेडकर स्मशानभूमीच्या साडेनऊ एकर जागेमध्ये अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना अद्ययावत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आठ विद्युतदाहिन्यांसह प्रार्थनास्थळ ‘नक्षत्र उद्यान’ विकसित केले जाणार आहेत. वरळीतील स्मशानभूमीसह छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील भागोजी कीर स्मशानभूमीच्या नूतनीकणाची पाहणी आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी करून आढावा घेतला.
पालिकेच्या या दोन्ही स्मशानभूमींच्या पहिल्या टप्प्यातील काम सध्या सुरू आहे. यामध्ये वरळीच्या रमाई आंबेडकर स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यदर्शनाचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार असून याची लिंक पालिकेच्या पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. यामुळे परदेशात पिंवा दूरच्या ठिकाणी राहत असणारे आणि अंत्यदर्शनाला येऊ न शकणाऱ्या नातेवाईकांना ऑनलाइन अंत्यदर्शन घेता येणार आहे. अशा प्रकारचे नियोजन असणारी ही पालिकेची पहिलीच स्मशानभूमी असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. या ठिकाणी रुंद रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता अशा सुविधा देण्यात येणार आहेत. आगामी तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, सहायक आयुक्त किरण दिघावकर, शरद उघडे, युवा सेनेचे अभिजित पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना स्मशानभूमीच्या ठिकाणी अद्ययावत सुविधा देण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे हिरालाल पारीख चॅरिटेबल परिवार ट्रस्टचे डॉ. रमनिक पारेख यांनी सांगितले.
भागोजी कीर स्मशानभूमीचे नूतनीकरण
छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असणाऱ्या भागोजी कीर यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात येत असून हे काम चांगल्या दर्जाचे करण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली. त्यासोबतच लगतच्या चैत्यभूमीच्या परिसराची पाहणी करून हा परिसरसुद्धा अधिक सुशोभित करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना दिले. तसेच भागोजी कीर स्मशानभूमीसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून अंतर्गत सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.


























































