राज्यात शिक्षणापासून वंचित किती मुले आढळतील? स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली शंका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही पूर्वतयारीशिवाय राज्यात 1 मार्चपासून सुरू झालेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात नेमकी किती मुले सापडतील, अशी शंका शिक्षणापासून वंचित मुलांसाठी काम करणाऱया स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केल आहे.

कोरोनामुळे काही जिह्यांत हे सर्वेक्षण स्थगित करण्यात आले असून काही जिल्ह्यांत सर्वेक्षण सुरू झाले आहे. मात्र वंचित मुलांसाठी काम करणाऱया स्वयंसेवी संस्थांनी हे सर्वेक्षण स्थगित करण्याची मागणी केली आहे.

सर्वेक्षणाविषयी कोणतीही पूर्वतयारी नाही, स्वयंसेवी संस्थांशी चर्चा नाही. शालेय शिक्षणमंत्री आणि प्रमुख अधिकारी अधिवेशनाची तयारी करीत असताना हे सर्वेक्षण कसे होत आहे, असा सवाल नोडल पर्सन स्वयंसेवी संस्था व सर्वेक्षण समिती 2015 चे सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.

घाईघाईने जाहीर केलेल्या व कोणत्याही पूर्वतयारीशिवाय होत असलेल्या सर्वेक्षणात किती मुले आढळतील, या गंभीर विषयाची सरकारने थट्टा करू नये, एकतर सर्वेक्षण अनेक वर्षे होत नाही व झाले तर इतक्या ढिसाळपणाने होते. त्यामुळे संपूर्ण सर्वेक्षण स्थगित करून स्वयंसेवी संस्थासोबत चर्चा करून सर्वेक्षण पद्धती नक्की करावी, सर्व शिक्षकांच्या बैठका घ्याव्यात व शालाबाह्य कोणाला म्हणावे हे निकष नक्की करावे मगच सर्वेक्षण करावे. तोपर्यंत कोरोनाचा धोकाही कमी होईल अशी सूचना स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे.