कोल्हापूर – महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे 3 कोटी 56 लाखांचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 3 कोटी 56 लाख 74 हजार 720 रुपयांचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये 35 कोटी 52 लाख 28 हजार 650 रूपये जमा तर 31 कोटी 95 लाख 53 हजार 930 रुपयांच्या खर्चाची अपेक्षित तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिर,वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्रीजोतिबा,नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिरांसह अनेक प्राचीन मंदिरे आहेत. कोल्हापूरसह सांगली आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील एकूण 3 हजार 67 मंदिरांचे व्यवस्थापन प.महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून केले जाते. देवस्थान समितीच्या येथील मुख्य कार्यालयात सचीव विजय पोवार यांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाज -पत्रक सादर केले.यावेळी समितीचे अध्यक्ष महेश जाधव,कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर,सदस्य शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

या अंदाजपत्रकात दख्खनचा राजा जोतिबा मंदिराचा विकास आराखड्यासाठी दहा कोटी, श्री.अंबाबाई मंदिर परिसरातील ताराबाई रोड आणि नृसिंहवाडी येथील भक्त निवासासाठी अनुक्रमे 2 व 4 अशा एकूण 16 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शिवाय भाविक व नागरिकांना अत्यल्प दरात आरोग्य सेवा म्हणून पॅथॉलॉजी लॅब साठी 6 कोटी,सामाजिक मदती साठी दिड कोटी यांसह मंदिराच्या सर्व्हे साठीही तरतुद करण्यात आली आहे.

सन 2019-20 मध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात 14 कोटी 43 लाख 39 हजार 527.52 रुपये जमा, एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या लॉकडाउनच्या काळात 4 कोटी 85 लाख 67 हजार 135.13 रुपये जमा आणि 13 कोटी 35 लाख 81 हजार 621.68 रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. दख्खनचा राजा श्रीजोतिबा मंदिरासाठी सन 2019-20 मध्ये 1 कोटी 50 लाख 75 हजार 450.58 जमा व एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये 3 कोटी 15 लाख 35 हजार 184.60 रूपये जमा आणि या दोन्ही मंदिरांसह सर्व मंदिरांची एकत्रित जमा 19 कोटी 17 लाख 68 हजार 763 तर एकूण खर्च 14 कोटी 44 हजार 952.24 रुपये दाखविण्यात आला आहे.