गोव्याच्या देवभूमीवरील कॅसिनोंविरुद्ध आंदोलन उभे रहावे! शिवसेना नेते संजय राऊत यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा ही देवभूमी असून या देवभूमीवर कॅसिनो जुगाराचे अतिक्रमण होत आहे. पर्यटक व अन्य लोक केवळ कॅसिनो खेळण्यासाठीच गोव्यात येतात. कॅसिनोंचे हे आक्रमण रोखण्यासाठी आंदोलन उभे रहायला हवे, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी येथे केले.

‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी लिहिलेल्या ‘रोमट’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर आणि ज्येष्ठ पत्रकार अश्विन तोंबट याप्रसंगी उपस्थित होते.

गोव्यात कॅसिनो जुगार खेळण्यासाठीच सर्व प्रवासी येत असल्याचे आपल्याला विमानातून येताना प्रवाशांमधील चर्चेतून जाणवले अशी खंत व्यक्त करतानाच हे चित्र बदलायला हवे अशी अपेक्षाही खासदार राऊत यांनी व्यक्त केली. गोव्यातील राजकीय अस्थिरतेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. गोव्यातील आमदार घाऊक पद्धतीने फुटतात. त्यामुळे इथे राजकीय शुद्धीकरणाची गरज असून त्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही खासदार राऊत यांनी केली.

गोमंतकीय पत्रकारितेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ‘लोकमत’च्या योगदानाची नोंद घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असे विचार यावेळी विजय बाविस्कर यांनी मांडले. अश्विन तोंबट यांनी नायक यांची पत्रकारितेतील वाटचाल मांडली तर गोव्याचे चौफेर दर्शन घडवणारे ‘रोमट’ पुस्तक नव्या पिढीकडून निश्चितच वाचले जाईल, असा विश्वास याप्रसंगी नायक यांनी व्यक्त केला.

या प्रकाशन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री रवी नाईक, माजी अर्थ सचिव दौलतराव हवालदार, साहित्यिक दिलीप बोरकर, लेखक दत्ता नायक, पराब परोब, पांडुरंग फळदेसाई, हेमा नायक आदी मान्यवर उपस्थित होते.