
नगर अर्बन को-ऑप. बँकेच्या तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज चारजणांना अटक केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नगर अर्बन बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक घनश्याम बल्लाळ, राजेंद्र हुंडेकरी, प्रदीप पाटील, स्वप्नील बोरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नगर अर्बन को-ऑप. बँकेच्या शाखेतून तीन कोटी रुपयांचा चिल्लर घोटाळा उघडकीला आला होता. ही बाब बँकेच्या ऑडिटमध्ये लक्षात आल्यानंतर यासंदर्भात काहींनी लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापनाने या प्रकारच्या संदर्भामध्ये चंगेडिया-फिरोदिया समितीच्या अधिपत्याखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल बँक प्रशासनाला प्राप्त झाला होता. यामध्ये घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार संबंधित चौकशी समितीने गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील निर्देश बँक प्रशासनाला दिले होते. त्यानंतर 22 डिसेंबर 2020 रोजी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात तीन कोटी रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळाचा समावेश आहे. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले होते.
दरम्यान, बँकेने तपासासाठी कागदपत्रे सादर न केल्याने आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्या पथकाने चार दिवसांपूर्वी बँकेवर धाड टाकून दोन दिवस कागदपत्रांची पडताळणी केली. यात साधारणतः 16 फाइल्स हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांची चौकशी केली होती. या चौकशीमध्ये म्हणावी अशी उत्तरे देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास केल्यानंतर मार्केटयार्ड शाखेतून पैसे न भरता धनादेश वटल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. यामध्ये आज चारजणांना अटक करण्यात आली आहे.
आम्ही या प्रकाराचा तपास सुरू केल्यानंतर अनेक प्रकारची माहिती उजेडात आलेली आहे. काही खातीसुद्धा तपासण्यात आली आहेत. यामध्ये अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही ही कारवाई सुरू केली आहे. यामध्ये दोषी असणाऱयांची नावे आम्ही निष्पन्न करत असून, लवकरच त्यांना अटक करणार आहे.
– प्रांजल सोनवणे, उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.
दिलीप गांधींसह 11 जणांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
n नगर अर्बन बँकेच्या तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने बँकेच्या माजी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांना उद्या (दि. 13) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात भाजपचे माजी खासदार तथा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी, अजय बोरा, अनिल कोठारी, दीपक गांधी, शैलेश मुनोत, किशोर बोरा, संजय लुनिया, केदार केसकर, साधना भंडारी, मनीष साठे यांच्यासह तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत गांधी यांचा समावेश आहे.
डॉ. नीलेश शेळकेचा ताबा पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे
– नगर अर्बन बँकेच्या 22 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झालेल्या गुह्यात पाचजणांच्या खात्यामध्ये पैसे गेल्याचे उघड झाले आहे. यात नगर शहर सहकारी बँकेच्या गुह्यात अटकेत असलेल्या डॉ. नीलेश शेळके याचाही समावेश आहे. त्यामुळे डॉ. शेळके याला पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 22 कोटी रुपयांचे कर्ज कधी मंजूर केले, कोणाला अधिकार होते, ते पैसे कोणाच्या नावावर जायला पाहिजे होते, याची माहिती बँकेकडून आर्थिक गुन्हे विभागाने घेतली आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती वाढत जाणार आहे, यामध्ये अनेकांची नावेसुद्धा निष्पन्न होणार आहेत. सध्या आम्ही कागदपत्रांनुसार तपास सुरू केलेला आहे. त्यामुळे गुन्हेगारांची संख्यासुद्धा वाढण्याची शक्यता आहेत. आमचे एक पथक आरोपींचा शोध घेत आहे.
– वसंत बाबर, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे.































































