
वायरमन, प्लंबर, इलेक्ट्रिशियन यासह आयटी क्षेत्रातील राज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागीर, कामगार आदी घटकांना आता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत प्रमाणित केले जाणार आहे. या कामगारांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी त्यांना भत्ताही दिला जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राज्य शासनामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यात घरेलू कामगार, शेती क्षेत्रातील विविध कुशल कारागीर, बांधकाम कामगार, मिस्त्री, सुतार कारागीर, टेलर, केंटर, वाहनचालक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांतील कुशल कारागीर काम करतात.
यातील बहुतांश कारागीर हे विशिष्ट कौशल्य धारण करणारे पण असंघटित आहेत. तसेच त्यांच्याकडे चांगले कौशल्य असले तरी त्याविषयीची कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात त्यांना अडचणी येतात. शिवाय खासगी क्षेत्रातही त्यांना वेतनवाढ, बढती इत्यादी प्रकारचे प्रोत्साहन मिळण्यातही अडचणी येतात. त्यामुळे या कौशल्यधारी कारागीरांना आता पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजनेतून प्रमाणित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.






























































