नवी नवलाई सरण्याच्या आत गोंधळाष्टक, बायको भाच्यासोबत पळून गेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेमात आकंठ बुडालेल्या माणसाला योग्य, अयोग्य यातला फरक कळत नाही असे म्हणतात. बिहारमधील गोपालगंज येथे घडलेल्या घटनेमुळे या वाक्याची पुन्हा आठवण झाली आहे. बिहारमधील सुरवनिया गावात राहणाऱ्या राकेश शर्मा यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांचे 22 फेब्रुवारी रोजी हरपूर गावात राहणाऱ्या एका तरुणीशी धूमधडाक्यात लग्न झाले. राकेश शर्मा सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होते, मात्र त्यांची स्वप्ने हवेतच विरली.

लग्नाच्या आठ दिवसांतच राकेश यांचा बरेली येथे राहणारा भाचा त्याच्या काही मित्रांसह त्यांच्या घरी आला. त्याने मामीला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. मामीलाही बघताक्षणी तिचा भाचा आवडला होता. दोघांनी एकमेकाजवळ प्रेमाची कबुली दिली आणि योग्य संधी मिळताच पळून जायचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार हे दोघेजण पळूनही गेले. लग्नाला 8 दिवसही होत नाही तोच नवरी पळून गेल्याने गावात खळबळ उडाली. ही नवरी भाच्यासोबत पळाल्याचं कळाल्याने गावभर याचीच चर्चा सुरू होती.

या घटनेमुळे राकेश यांची जाम पंचाईत झाली असून त्यांनी बायकोसोबत पळून गेलेल्या भाच्याविरोधात आणि भाच्याच्या चार मित्रांविरोधात मांझागढ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस अधिकारी रविकांत दुबे यांनी राकेश यांच्या भाच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या मामी-भाच्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.