मूकबधिर चालवतायत हॉटेल! सांकेतिक भाषेतून ग्राहकांशी संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्याच्या एका हॉटेल मालकांनी केलेल्या ‘स्पेशल’ प्रयोगाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मूकबधिरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी या हॉटेलात चक्क 20 मूकबधिरांना रोजगार देण्यात आला आहे. हॉटेल मालकांनी उचललेल्या या सकारात्मक पावलाचे ग्राहकांकडून स्वागत होत आहे.

एफ. सी. रोडवरील टेरासीन या हॉटेलात हा भन्नाट प्रयोग करण्यात आला आहे. येथील कर्मचाऱयांना ऐकता किंवा बोलता येत नसले तरी ते सांकेतिक भाषेतून संवाद साधून ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देत आहेत. हॉटेलात एखाद्या पदार्थाची ऑर्डर देताना आपण आधी मेन्यूकार्ड बघतो. या हॉटेलातील मेन्यू कार्डदेखील स्पेशल आहे. मेन्यूकार्डवर नजर टाकल्यास त्यातील प्रत्येक पदार्थासमोर एक विशिष्ट सांकेतिक चिन्ह आहे. ऑर्डर देण्यासाठी ग्राहकांनी सांकेतिक भाषेचा वापर कसा करावा हे देखील मेन्यूकार्डमध्ये सोप्या भाषेत सांगितले आहे. या चिह्यांच्या मदतीने ग्राहक आपल्या मनपसंत जेवणाची ऑर्डर देत आहेत. हॉटेलात येणाऱया प्रत्येक ग्राहकाचे स्वागत करणे, त्यांना काय हवं-काय नको ते विचारणे ही सर्व कामे हे कर्मचारी सांकेतिक भाषेतच करतायत.

सध्या आमच्या हॉटेलात विविध पदांवर 20 मूकबधिर कर्मचारी काम करत आहेत. मूकबधिरांचा आत्मविश्वास वाढावा आणि ते आत्मनिर्भर व्हावेत हाच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यामागचा मुख्य हेतू आहे. – सोनम कापसे, हॉटेल मालक