लेख – शारीरिक स्वास्थ्य, तणाव आणि संगीतोपचार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मारुती साळुंखे

जगभरातील लोकांच्या तणावाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक दशकात जागतिक पातळीवर तणावाची पातळी 12.7 टक्के म्हणजेच 13 टक्क्यांनी वाढत आहे व त्याचा परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर होत आहे. याकरिता संगीतोपचार हा उत्तम व परिणामकारक उपचार ठरत आहे. संगीतामुळे भावनांचे पोषण होते आणि शरीराचा जसा मनावर परिणाम होतो तसा मनाचा शरीरावर परिणाम होतो आणि शरीर व मन एकमेकांशी निगडित असल्याने व संगीताचा मनावर परिणाम होत असल्याने संगीतोपचाराचा जन्म झाला असावा.

संगीत म्हणजे काय, तर लयबद्ध आणि मधुर आवाज म्हणजे संगीत हे आपणा सर्वांना ज्ञातच आहे आणि हेच संगीत जेव्हा मनाला आल्हाददायक आणि स्फूर्ती देणारे ठरते तेव्हा ते सतत ऐकत राहावे असे वाटते. संगीताची निर्मिती ही हिंदुस्थानात झाली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे चार वेद आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीचा पाया आहे. पैकी सामवेद हा संगीताने परिपूर्ण आहे. म्हणजेच संगीताची सुरुवात ही सामवेदापासून झालेली आहे. हिंदुस्थानी संगीताला विश्व संगीताचा पाया समजतात, नव्हे तो आहेच. कारण याच संगीतावर जागतिक संगीत विसंबून आहे. संगीत हे निसर्ग, गणित व विज्ञान या त्रिकोणाचा आविष्कार आहे.

आपल्या मनाचा आणि संगीताचा संबंध अतिशय जवळचा आहे. आपण जेव्हा कोणतेही संगीत ऐकतो तेव्हा त्याचे विद्युततरंग स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जूमधून स्वयंप्रेरित चेतासंस्थेमार्फत जातात आणि त्याचा प्रभाव हृदयाच्या गतीवर, रक्तदाबावर व स्नायूंवर पडतो. उदाहरणच द्यायचे झाले तर कर्णकर्कश आवाजामुळे हृदयाची गती वाढते, रक्तदाबही वाढतो, परंतु याउलट जेव्हा आपण एखादे अंगाई गीत किंवा तालासुरातील सुमधुर गीत ऐकतो तेव्हा हृदयाची गती व रक्तदाब दोन्हीही सुरळीत झालेले आपल्याला आढळतील. संगीताचा प्रभाव हा मनाबरोबर शारीरिक हालचालींवरही होतो. संगीताचा इतिहास थोडक्यात पाहिला असता आपल्या लक्षात येईल की, संगीत ही कला म्हणून सादर करता यावी या हेतूने संगीताचा उगम झालेला नसून भावनांचे प्रगटीकरण म्हणून संगीताचा उदय झालेला आहे. मानवी जीवनात 70 टक्के रोग हे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे किंवा ताणतणावामुळे होतात हे प्रयोगाअंती सिद्ध झालेले आहे आणि या ताणतणावाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास एका जागतिक संस्थेकडून गेल्या 40 वर्षांपासूनचा सर्व्हे केला गेला. त्यातून निघालेला निष्कर्ष असा आहे की, जगभरातील लोकांच्या तणावाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक दशकात जागतिक पातळीवर तणावाची पातळी 12.7 टक्के म्हणजेच 13 टक्क्यांनी वाढत आहे व त्याचा परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर होत आहे. याकरिता संगीतोपचार हा उत्तम व परिणामकारक उपचार ठरत आहे. संगीतामुळे भावनांचे पोषण होते आणि शरीराचा जसा मनावर परिणाम होतो तसा मनाचा शरीरावर परिणाम होतो आणि शरीर व मन एकमेकांशी निगडित असल्याने व संगीताचा मनावर परिणाम होत असल्याने संगीतोपचाराचा जन्म झाला असावा.

सध्याचे प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे तणावग्रस्त बनत असल्यामुळे आपल्याला विविध व्याधींशी सामना करावा लागत आहे. त्या व्याधींवर आपण वेगवेगळे वैद्यकीय उपचार करतच असतो. त्या उपचारांसोबतच किंवा उपचारांना सहकार्य म्हणून संगीतोपचाराचा फार मोठा उपयोग होत आहे. म्हणजे एखाद्या रोगावर आपले उपचार पर्यायाने अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथीचे चालू असतील तर ते उपचार बंद न करता त्या उपचारांना सहकार्य म्हणून व रोग मुळासकट बरा होण्याकरिता संगीतोपचार हा प्रभावी उपाय आहे. मुळापर्यंत पोहोचलेला रोग जास्त काळजी करण्यासारखा असतो. म्हणून तो मुळासकट बरा होणे आवश्यक असते आणि तो मुळासकट बरा करण्याचे सामर्थ्य संगीतोपचारांमध्ये आहे. संगीत, ध्यान, प्रार्थना इत्यादी क्रिया मेंदूच्या कार्यप्रणालीला पोषक ठरतात. त्याचा चांगला परिणाम हा आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया व कार्यप्रणालीवर होतो. पारंपरिक संगीत म्हणजे भजन, भक्तिगीते, अभंग ऐकल्याने आपल्या हृदयाचे ठोके सुरळीत होतात हे अनुभवाअंती सिद्ध झालेले आहे. आकाशातले ढग जसे वाऱयाने दूर सारले जातात तसे संगीताने शारीरिक रोग दूर सारले जातात.

संगीताने वेदनाशमन तर होतेच, परंतु त्याच बरोबरीने संगीताने मानसिक अवस्थेत सकारात्मक बदलही घडून येतात. संगीताच्या मधूर लहरी एकाग्रता वाढवत असल्याने विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास पूर्णपणे लक्षात ठेवण्यास उपयोगी होतो. संगीतोपचाराने हृदयगती, रक्तदाब तसेच तणाव नियंत्रणात येतो. संगीत आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आनंद निर्मिती करते. सामाजिक, भावनिक, शैक्षणिक आणि व्यावहारिक विकारांसाठीसुद्धा संगीतोपचार आवश्यक आहे. मानसिक थकवा घालवण्यासाठी संगीताचे महत्त्व ओळखून महान तत्त्वज्ञ पायथागोरस, ऑरिस्टॉटल, प्लेटो यांनीसुद्धा संगीतोपचाराला दुजोरा दिलेला आहे. संगीताचा परिणाम व्यक्तीच्या भौतिक, मानसिक, व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनावर होतो हे आता सर्वांनी मान्य केले आहे. इतकेच नव्हे तर संगीतोपचाराने गतिमंद मुलांवर चांगला परिणाम होऊन मुलांची एकाग्रता व आकलनशक्ती वाढते.

अनेकांना अशी शंका येईल की, संगीताने आनंद किंवा विरंगुळा मिळू शकतो हे ठीक आहे, परंतु रोग कसे काय बरे होतात. कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे की, रक्त, हार्मोन्स ग्रंथी, पेशी, स्नायू, हाडे आणि मेंदू या सर्वांवर लहरींचा परिणाम होतो म्हणजेच संगीताचा परिणाम होतो. अलीकडेच एका झालेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे की, मधुमेह, संधिवात, मासिक पाळीमधील पोटदुखी या सर्व प्रकारच्या रुग्णांवर संगीतोपचाराने अतिशय चांगला परिणाम झालेला आहे. शरीरातील द्रव पदार्थांची पातळी संतुलित राखण्यास संगीत मदत करते.

अमेरिकेमध्ये 1944 पासून संगीतोपचार सुरू असून त्याच अनुषंगाने 1998 मध्ये अमेरिकन म्युझिक थेरपी असोसिएशनची स्थापना झाली. युनायटेड किंगडम (यू.के.) या देशात दोन्ही महायुद्धांच्या काळात जे सैनिक हॉस्पिटलमध्ये भरती होते, त्यांच्यावर इतर उपचारांच्या बरोबरीने संगीतोपचारही केले जात होते.

आपल्या देशात आणि जगात संगीतोपचाराविषयी कमी लोकांना माहीत आहे. आज अनेक देशांत संगीत चिकित्सेद्वारे रोगमुक्ती केली जात आहे. ऑस्ट्रेलिया या देशात तर प्रत्येक रुग्णालयात संगीतोपचार तज्ञ असणे सक्तीचे केलेले आहे, परंतु ज्या देशात म्हणजे हिंदुस्थानात हजारो वर्षांपूर्वी संगीत चिकित्सेची सुरुवात झाली ती हिंदुस्थानी संगीत चिकित्सा ही संगीत चिकित्सेची जननी असूनही आपल्याच देशात दुर्लक्षित आहे. सन 1993 मध्ये ‘भारतीय संगीत चिकित्सा अनुसंधान परिषद’ आपल्या देशात सुरू झाली असून त्या माध्यमातून संगीत चिकित्सा या विषयावर काम चालू असून विविध आजारांच्या रुग्णांवर प्रयोग केले जात आहेत व प्रयोगातून विस्मयजनक परिणाम जाणवत आहेत. शारीरिक व मानसिक असंतुलित झालेले आरोग्य संगीतोपचाराने पुन्हा संतुलित करता येते हे संगीताचे सामर्थ्य आधुनिक विज्ञानाने आणि वैद्यक शास्त्र्ााने पुन्हा शोधून काढले आहे. संगीतोपचाराला आता दिवसेंदिवस जास्त महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. यास्तव आजच्या जागतिक संगीतोपचार दिनी आपण सर्वांनी संकल्प करूया, इतर उपचारांच्या बरोबरीने संगीतोपचारदेखील करूच.