
नोकरी गेल्यानंतर नैराश्यातून एका इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढव्यातील कावेरी पार्वâ सोसायटीत आज उघडकीस आली. ऋषिकेश मारुती उमाप (वय 29, रा. कावेरी पार्क सोसायटी, कोंढवा खुर्द) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
ऋषीकेश उमाप कावेरी पार्क परिसरातील एका इमारतीत आई-वडिलांसोबत राहत होता. सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे झोपला. त्यानंतर त्याने आज पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्याचे दिसून आले. ऋषिकेश इंजिनिअर असून लॉकडाउनमुळे त्याची कंपनी बंद पडली होती. त्यामुळे नोकरी गेली होती. तेव्हापासून तो घरीच होता. सोमवारी रात्री तो खोलीत झोपायला गेला.
सकाळी उशीर झाल्यानंतर तो दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे घरच्यांनी दरवाजा वाजविला असता आतमधून आवाज आला नाही. त्यामुळे दरवाजा तोडला असता ऋषिकेशने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर घरच्यांनी माहिती कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्याचा मृतदेह शवविच्छेनासाठी पाठविला आहे. खोलीत सुसाईट नोट आढळुन आलेली नाही.



























































