महाराष्ट्रातील रस्ते विकासाची गाडी वेगात! गुहागर-चिपळूण, तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर मार्गाच्या कामाला गती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील रस्ते विकासाच्या कामाला गती देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली. कोकणातील गुहागर-चिपळूण, तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव-मनमाड, मराठवाडय़ातील परळी-गंगाखेड तसेच विदर्भातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी 2780 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

‘प्रगती का हायवे’ असा हॅशटॅग वापरत नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एकामागून एक ट्विट करत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून रस्त्यांची पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणाची कामे प्रामुख्याने हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

  • विदर्भातील रस्ते विकासाच्या कामांसाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. आमगाव ते गोंदिया मार्गासाठी 239.24 कोटी. नागपूरमध्ये आरटी चौक ते नागपूर विद्यापीठ परिसरापर्यंत उड्डाणपूल आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर एमआयडीसी जंक्शन चार पदरी उड्डाणपूल यांच्या कामासाठी 478.83 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. तिरोर-गोंदिया राज्य महामार्गासाठी 288.13 तसेच दुपदरी मार्गासाठी 282 कोटी. वाटूर ते चारठाण पुनर्बांधणीस 228 कोटी. गडचिरोलीतील रस्ते आणि 16 लहान -मोठय़ा पुलांच्या बांधकामासाठी 282 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

कोकणातील रस्त्यांना 338 कोटी

कोकणातील राष्ट्रीय महामार्ग 166-जी वरील गुहागर-चिपळूणला जोडणाऱया रस्त्याच्या कामासाठी 171 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच तळेरे-बावडा-कोल्हापूर या रस्त्याच्या कामासाठी 167 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

  • उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग 753-जेवरील जळगाव-भद्रा-चाळीसगाव-नांदगाव-मनमाड या रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी करण्यात येणार आहे.
  • मराठवाडय़ातील राष्ट्रीय महामार्ग 361-एफवरील परळी ते गंगाखेड रस्त्याची पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी 222 कोटी 44 लाख रुपये मंजूर. तसेच नांदेड जिह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर बांधण्यात येणाऱया पुलासाठी 188 कोटी 69 लाख रुपये मंजूर केले आहेत. हा पूल राष्ट्रीय महामार्ग 63 चा भाग असणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करणार

शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्लीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण त्याचप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील महामार्ग चौपदरीकरणात जमीन गेलेल्यांच्या प्रलंबित देयकांसंदर्भात तसेच महामार्गाचे काम वेगाने पूर्ण व्हावे. त्याचप्रमाणे कोकणातील राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न, रस्ते प्रकल्प व विविध कामांसंदर्भात नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली. चौपदरीकरण वेगाने पूर्ण केले जाईल त्याचप्रमाणे देयकांबाबतची प्रक्रियाही वेगाने पूर्ण होईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.