
देशात दर दिवसाला कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत जात आहे. गेल्या 24 तासात देशात 89,129 कोरोनाग्रस्त आढळून आले असून ही गेल्या सप्टेंबरपासूनची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचे दिसून येत आहे. याआधी एवढा मोठा आकडा अखेरचा 19 सप्टेंबर 2020 ला नोंदविण्यात आला होता.
देशात गेल्या 24 तासात 89,129 कोरोनाग्रस्त आढळले तर 714 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. 44,202 जण कोरोनामुक्त झाली आहेत. देशातील एकूण 1 कोटी 23 लाख 92 हजार 260 जणांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यातील 6,58,909 कोरोनाग्रस्त हे अॅक्टिव्ह असून 1,15,69,241 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 1,64,110 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील रुग्णसंख्या महिनाभरात 17 हजारांवरून 96,000
मुंबईत कोरोना झपाटय़ाने वाढत असून मार्चमध्ये एकाच महिन्यात तब्बल 96 हजार 590 बाधित आढळले आहेत. फेब्रुवारीच्या संपूर्ण महिन्यात केवळ 17 हजार 473 रुग्ण आढळले होते. म्हणजेच एकाच महिन्यात बाधितांच्या संख्येत साडेपाच पट आणि मृतांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.



























































