मुंबईतील खारफुटी वाचवण्यासाठी कलावंत एकवटले, कलेतून करतायत जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरातील खारफुटी आणि पाणथळ जागांच्या रक्षणासाठी कलाकार एकवटले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर ’मेकआर्ट फॉर मुंबईज मॅन्ग्रोव्हस’ हे अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत नयना श्रीमाली, वैशाली चुडासामा, अंजली मेहता, मीरा मल्होत्रा, अफ्रा शफीफ आणि मिशेल पुनावाला या सहा कलाकारांच्या कलाकृती सादर झाल्या आहेत. मुंबईतील हरितपट्टा, त्यातील अधिवास आणि जैवविविधता जपणे हा अभियानाचा उद्देश आहे.

‘मेकआर्ट फॉर मुंबईज मॅन्ग्रोव्हस’मध्ये पक्षीप्रेमी नयन श्रीमाली आणि वन्य जीव संरक्षक वैशाली चुडासामा या जोडीने कागदी कलाकृती सादर केली आहे. त्यातून खारफुटीमध्ये अधिवास असलेल्या पक्ष्यांच्या 17 प्रजातींचे वर्णन केले आहे. कलाकार अफ्रा शफिक बदलत्या यांनी परिसराशी आणि परिस्थितीशी पटकन जुळवून घेण्याचे खारफुटीचे वैशिष्टय़ अधोरेखित केले आहे. अफ्रा यांनी पारंपरिक लोककला, डिजिटल कला आणि मोझेक यांच्यावर आधारित ऑनिमेशन कलाकृती तयार केली आहे. मुंबईतील व्हिज्युअल आर्टिस्ट मीरा मल्होत्रा यांनी वैशिष्टय़पूर्ण इलस्ट्रेटर तयार केलंय. कलाकार मिशेल पुनावाला यांनी ‘फुलपाखरू’ मालिकेमधून हिरव्यागार खारफुटी जंगलाचे वर्णन करणारी एक नवीन रचना तयार केली आहे. स्वभू कोहली यांनी खारफुटीची जंगले, त्यातील गुंतागुंती आणि रहस्यमयता आपल्या कलाकृतीतून दाखवली आहे. हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे. या उपक्रमाला सिदजी, यश प्रधान, तारा आनंद, पूनम बिश्त, विष्णू, दीप्ती, सचिन भट्ट आणि विभव सिंग या कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे.