समाजमनाचा वेध घेणारी दिग्दर्शिका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • धनंजय कुलकर्णी

सुमित्राताई यांनी स्वतःची शैली निर्माण केली. सामाजिक, कौटुंबिक समस्यांचा वेध घेताना त्यांनी आक्रस्ताळपणा टाळला. मानवी मनाच्या अंतरंगात शिरून आतून त्या प्रश्नाच्या उकलतेचा विचार केला. दांभिकपणाचे सामाजिक मुखवटे त्यांनी टराटरा फाडण्याऐवजी संयमितपणे तो प्रश्न हाताळला. एकूणच सुमित्रा भावे यांच्या विचारी, समंजस, परिपक्व आणि बुद्धिमान  स्वभावाला साजेशी अशी त्यांची कलाकृती असायची.

मानवी नातेसंबधातील अनेक पदरांचा हळुवार वेध घेत सुमित्रा भावे यांच्या चित्रपटातील पात्रे प्रेक्षकांपुढे येत असायची. ही पात्रे सच्ची असायची. हाडामांसाची असायची. त्यांच्या भूमिकांना प्रामाणिकतेचा ध्यास असायचा. त्यामुळे सुमित्रा भावे यांचा सिनेमा मनाला आतून भिडायचा. गंमत म्हणजे नव्वदच्या दशकात मराठी सिनेमा दर्जाच्या बाबत घसरणीच्या पातळीवर पोचला होता. अचकट-विचकट विनोद करून त्याचा पार चोथा होत होता. त्यावेळी सुमित्रा भावे यांनी या क्षेत्रात एक नवा बुद्धिजीवी सिनेमाचा अध्याय जोडला. त्यांचा सिनेमा प्रेक्षकांना विचार करायला लावायचा. एक सशक्त कथाबीज घेऊन तो पडद्यावर यायचा. सुमित्रा भावे यांची दिग्दर्शनासोबतच लिखाण शैली अफाट होती.  चित्रपटाशी निगडित इतर सर्व बाबींवर त्यांचं बारीक लक्ष असायचे. त्यामुळेच सिनेमाचे संगीत, छायाचित्रण, संकलन, पात्र निवड, पटकथा, संवादशैली, पार्श्वसंगीत या पूरक गोष्टींकडे त्या सजगतेने पाहायच्या.

चित्रपटाचे वितरण किंवा आपला प्रोडक्ट् विकणं मात्र त्यांना कधी जमलं नाही. असं त्यांनी स्वतः कबूलही केलं होतं. चांगली कलाकृती बनवणे, त्याची निर्मितीमूल्ये चांगली असणे इथवरच त्यांनी आपली कार्यमर्यादा घालून घेतली होती. अर्थात त्यानी सिनेमासाठी निवडलेले विषय सर्वसामान्यांच्या पचनी पडणे तसे अवघडच होते. आपल्या इथे सिनेमाकडे केवळ मनोरंजन याच हेतूने पाहण्याचा सार्वत्रिक पायंडा असल्याने चाकोरीबाहेरच्या सिनेमाच्या वाटय़ाला जाणे टाळले जाते. समांतर अथवा कलात्मक सिनेमाला आपल्याकडे कायमच मर्यादित व्यावसायिक यश मिळत आले आहे हा इतिहास आहे. अर्थात व्यावसायिक यश मिळाले नाही म्हणून सुमित्रा भावे यांच्या चित्रपटांचे मूल्य अजिबात कमी होत आहे. सिनेमा म्हणजे खरं तर गोष्ट सांगण्याची कला! सुमित्राताई यांनी ती गोष्ट सांगताना स्वतःची शैली निर्माण केली. सामाजिक/कौटुंबिक समस्यांचा वेध घेताना त्यांनी आक्रस्ताळेपणा टाळला. सुमित्रा भावे यांची माध्यमावरील समज जबरदस्त होती. चित्रपट हे माध्यम समाजावर मोठय़ा प्रमाणावर परिणामकारक असू शकते यावर त्यांची श्रद्धा होती.

त्यानी 50 हून अधिक लघुपट बनवले. या लघुपटांना जगभरातून मोठी दाद मिळाली. त्यांचा ‘पाणी’ हा लघुपट तर पाकिस्तानातील ग्रामीण भागात मोठी ‘इनस्पयारिंग मूव्ही’ ठरला होता. तळमळीची सामाजिक कार्यकर्ती त्यांच्यात सुरुवातीपासूनच दडली होती. दिल्ली आकाशवाणीवर त्या काही काळ न्यूज रीडर होत्या. नंतर कर्व्यांच्या स्त्राr शिक्षण केंद्रात काही काळ त्यांनी अध्ययन केले. महात्मा गांधी त्यांच्यासाठी प्रेरणास्रोत होते. त्यांच्यावर त्यांना पीएचडी करायची होती. त्यांनी प्रबंधदेखील लिहिला होता. पुढे दादा धर्माधिकारी यांच्या विचारांनी त्या थेट समाजात जाऊन काम करू लागल्या. ग्रामीण भागातील स्त्रीया, कष्टकरी स्त्रीया, गुन्हेगार स्त्रीया त्यांचे प्रश्न याचा त्या खोलातून अभ्यास करू लागल्या. यावर पुस्तक लिहून त्या समस्या मांडू शकल्या असत्या, पण त्यांना याहून मोठे ‘माध्यम’ सापडले ते म्हणजे ‘सिनेमा’. 1984 साली त्यानी ‘बाई’ हा पहिला  लघुपट बनवला.

एरवी कुणीही हाताळणार नाही असे विषय त्यांनी अतिशय संवेदनशीलपणे पडद्यावर आणले. मानवी मनाचा आणि त्या अनुषंगाने समाजमनाचा ठाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने  मराठी भाषेत नितांतसुंदर चित्रपट येऊ शकले. डॉ. मोहन आगाशे यांनी त्यांच्या ‘अस्तु’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटात स्मृतिभ्रंश (Alzheimer) झालेल्या संस्कृत पंडिताची भूमिका केली होती. माणसाला आपला भूतकाळ सोयिस्कररीत्या विसरायचाच असतो, पण संपूर्ण भूतकाळच हरवून गेला तर? मनाच्या स्मृतीची पाटी एकदम कोरी झाली तर? अशा रुग्णांशी इतरांनी कसा संवाद साधायचा? जवळची रक्ताची नाती दुरावल्यानंतर एक अनोळखी अशिक्षित स्त्राr त्यांचा सांभाळ करते. मानवी स्वभावातील नात्यांचे अनेक गुंतागुंतीचे कंगोरे प्रेक्षकांपुढे येतात. या चित्रपटात आणि एकूणच सुमित्राताईंच्या चित्रपटात ‘रूपक’ खूप चांगल्या पद्धतीने येतात. यात हत्ती दाखवला आहे. मुलीची वडिलांच्या आजाराबाबतची भूमिका, आपल्या वडिलांनाच हा आजार का याचा विचार आणि analysis त्यातून येणारा अपराधीपणा तर दुसरीकडे तिच्याच वयाच्या स्त्राrने त्यांना आहे तसं accept करणं, त्यांचा सांभाळ करणं सारचं कसं मनाला भावविभोर करणारं होतं!

सुमित्रा भावे या समाजशास्त्रज्ञ होत्या. समाजातील प्रश्नांची त्यांना जाण होती आणि त्यावर आपल्या पद्धतीने उकल काढण्यासाठी त्यांनी सिनेमा हे प्रभावी माध्यम निवडलं. त्यांचा सिनेमा विचार करायला प्रवृत्त करणारा होता. मानसिक स्वास्थ्य आणि त्यावरील सिनेमे हा त्यांचा अभ्यासाचा विषय असला तरी ‘एक कप च्या’सारखा माहितीच्या अधिकारावरील सिनेमा असो, ‘वास्तुपुरुष’ सारखा घराची आस दाखविणारा विलक्षण वेगळा असा भन्नाट सिनेमा असो, एड्सवरील ‘जिंदगी जिंदाबाद’सारखा सिनेमा असो, ‘दहावी फ’ सारखा मुलांच्या सर्जनशीलतेचा अनोखा शोध घेणारा चित्रपट असो सुमित्राताईंची भूमिका ही कायम ‘स्टोरी टेलर’सारखी होती. सुमित्रा भावे या स्वतः एक विद्यापीठ होत्या त्यातून अनेक कलावंत घडत गेले. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून त्यांनी मानवी शाश्वत मूल्यांचा शोध घेतला.

दि. बा. मोकाशी यांच्या साहित्यकृतीवर आधारित त्यांचा ‘दिठी’ हा सिनेमा तयार होऊन दोन वर्षे झाली आहेत, पण अजूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकलेला नाही. त्वचाविकार ‘कोड’ (leucoderma) हा सुमित्रा भावे यांचा चित्रपट सौंदर्यबाबतचे फसवे निकष आणि व्याख्या यावर भाष्य करणारा होता. ‘देवराई ‘ या चित्रपटातून सुमित्राताई यांनी मनाच्या दुभंगलेल्या आजाराला (Schizophrenia) केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाचे कथानक लिहिले गेले. अतुल कुलकर्णीने ही भूमिका अतिशय समर्थपणे पेलली आहे. त्याच्या मनातील द्वंद्व, मनाच्या आतला स्वतःशीच असलेला संघर्ष फार परिणामकारकरीत्या दाखवला गेला होता. इथे रूपक म्हणून देवराई दाखवले आहे. हा सिनेमादेखील अनेक पुरस्कारांनी अलंकृत झाला.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीने अलीकडे ‘कासव’ नावाचा सिनेमा प्रेक्षकांपुढे आणला. सध्याच्या आभासी जगात वावरणाऱ्या समाजमनाला एकटेपणा खूप त्रास देत असतो. हा एकटेपणा त्याला नैराश्याकडे घेऊन जातो आणि काहींचे संपूर्ण आयुष्य वैफल्यग्रस्त बनवतो. ‘दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही.’ अशी अवस्था होऊन जाते. याच विषयाला अधोरेखित  करणारा हा चित्रपट होता. ‘कासव’ या चित्रपटात सुमित्रा भावे यांनी आजच्या तरुण वर्गाची वैफल्यग्रस्त अवस्था फार संवेदनशील रीतीने मांडली आहे. देवगडच्या समुद्रकिनाऱ्यावर चितारलेली हेही चित्रकथा मनाची मशागत करणारे होती. इथे पुन्हा कासव हे रूपक फार सुंदर रीतीने वापरले गेले. कासवाची मादी अंडी घालते आणि समुद्रात निघून जाते. या अंडय़ातून मग पिले बाहेर पडतात आणि पुन्हा समुद्राकडे जातात. हा त्यांचा छोटासा प्रवास खूप महत्त्वाचा असतो. इथेच खरं जपायचं असतं. या सिनेमातील नायकाचा प्रवास हा असाच महत्त्वाच्या वळणावर आला आहे. तो  असाच कोशात हरवला आहे. त्याला समाजात पुन्हा जायचे आहे, पण पुरता नैराश्याने वेढला गेला आहे. त्यामुळे त्याची जीवनयात्रा अवघड होऊन बसली आहे. कासवाच्या रूपकाची ही कथा खूप छान पद्धतीने को-रिलेट केली आहे.

त्यांनी याशिवाय 50 हून अधिक लघुपट, 15 चित्रपट, दूरदर्शन मालिका बनवल्या आहेत. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीने मराठी सिनेमाला एक कलात्मक मूल्य दिले. 50 हून अधिक पुरस्कारांनी त्यांचे सिनेमे सन्मानित झाले. मराठीमध्ये इतक्या मोठय़ा संख्येने पुरस्कार मिळविणाऱ्या सुमित्रा भावे कदाचित एकमेव असाव्यात. त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

 [email protected]