
दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने पुन्हा आठवडाभरासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हेच प्रभावी हत्यार आहे. त्यामुळे उद्यापासून पुढे सात दिवस म्हणजे 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दिल्लीत 19 एप्रिलपासून सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप कोरोनाचे रुग्ण कमी होत नाहीत. आतापर्यंत रुग्ण वाढीचा दर 36-37 टक्के एवढा होता, तो गेल्या दोन दिवसांत 30 टक्क्यांपर्यंत खाली आला असला तरी अद्याप त्यावर नियंत्रण मिळालेले नाही. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत आपण अनेक घटकांशी चर्चा केली असून त्यांनी लॉकडाऊन वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळेच उद्यापासून 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
ऑक्सिजनचा तुटवडा कायम
दिल्लीला दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. तर पेंद्र सरकारने 490 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्याचे मान्य केले आहे, परंतु तोही पूर्ण कोटा मिळत नसल्याने परिस्थिती बिघडत चालली असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.




























































