IPL 2021 – खेळाडू म्हणतात, बस झालं! आयपीएलमधून माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागला आहे. हिंदुस्थानात सुरू असलेल्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेलाही या संसर्गाचे ग्रहण लागले आहे. केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा, अॅण्ड्रय़ू टे या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी तसेच रविचंद्रन अश्विन या हिंदुस्थानी खेळाडूने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अशी भूमिका घेत आयपीएलला रामराम करून आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही खेळाडूंनी आयपीएल अर्धवट सोडून जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे या स्पर्धेवर फरक पडणार नाही. ही स्पर्धा सुरूच राहणार आहे, असा विश्वास बीसीसीआयच्या सूत्रांनी व्यक्त केला.

वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन व फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतल्याची माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून सोशल मीडियाच्या सहाय्याने देण्यात आली. दोघेही वैयक्तिक कारणामुळे यापुढील स्पर्धेतील लढतींमध्ये खेळणार नसल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अॅडम झाम्पावर 1.5 कोटींची तर केन रिचर्डसनवर 4 कोटींची बोली लावून आपल्या संघात घेतले होते. केन रिचर्डसन एक लढत खेळला असून अॅडम झाम्पाला अद्याप एकाही लढतीत संधी देण्यात आलेली नाही.

वाढत्या कोरोनाची भीती

राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अॅण्ड्रय़ू टे यानेही आयपीएल अर्धवट सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी तो म्हणाला, ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना संबंधित नियम आणखीन कडक करण्यात आले आहेत. परदेशातून येणाऱया व्यक्तींवर निर्बंध लावण्याची तयारी केली जात आहे. तसेच गेल्या ऑगस्ट महिन्यापासून फक्त अकरा दिवस मी कुटुंबासोबत वास्तव्य केले आहे. याच कारणांमुळे मला आयपीएल सोडावे लागले आहे. आता कुटुंबासोबत मला वेळ घालवायचा आहे, असेही तो आवर्जून म्हणाला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नर्व्हस

आयपीएलमध्ये सहभागी होत असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलियातही कोरोना वाढत आहे. त्यामुळे पुन्हा मायदेशात जाता येणार की नाही, हा प्रश्न यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक ऑस्ट्रेलियन खेळाडूसमोर उभा ठाकला आहे, असे मत कोलकाता नाईट रायडर्सचे मेण्टॉर डेव्हीड हसी यांनी व्यक्त केले. दिल्ली पॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी मात्र आपण जैव सुरक्षित वातावरणात असल्याचे सांगत बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या सुविधेचे काwतुक केले आहे.

कुटुंबासोबत लढा द्यायचा आहे

हिंदुस्थानचा व दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज व अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यानेही आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. याप्रसंगी तो म्हणाला, सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. माझे कुटुंब याचा लढा देत आहे. त्यांच्या या लढाईत मी त्यांच्यासोबत असणार आहे. त्यामुळेच आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.