आरे दूध विक्री केंद्र सायंकाळी सातपर्यंत चालू ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरे दूध केंद्रावर सध्या केवळ सकाळी 11 वाजेपर्यंत दुधाची विक्री करण्यास परवानगी आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात दूध शिल्लक राहत असल्याने दूध केंद्र चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याची दखल घेत सरकारने आरे दूध विक्री केंद्रावर सायंकाळी सात वाजेपर्यंत दुधाची विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेने केली आहे. बृहन्मुंबई दूध योजनेच्या माध्यमातून शासकीय दूध शाळेतून आरे दूध केंद्रांना नियमित दुधाचा पुरवठा होत आहे. दूध अत्यावश्यक पदार्थांमध्ये येत असल्याने कोरोना संकटातही दूध केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र सकाळी 11 वाजेपर्यंतच दुधाची विक्री करण्यास परवानगी असल्याने शिल्लक राहणाऱ्या अतिरिक्त दुधामुळे आरे केंद्र चालकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे आरे दूध केंद्र सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी द्यावी म्हणून महाराष्ट्र दूध वितरक सेनेने दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांना निवेदन दिले असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी दिली.