
कोरोनाच्या संकटाविरोधात ढाल बनून नागरिकांची सुरक्षा करणारे पोलीस मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर असतात. याची प्रचीती पुन्हा एकदा जुहू पोलिसांच्या चांगल्या कामगिरीमुळे आली आहे. एका भरकटलेल्या आणि दुर्दैवाने रस्त्यावर राहण्याची वेळ आलेल्या 75 वर्षीय शांती पटेल या वृद्धेला जुहू पोलिसांमुळे पुन्हा आपल्या भावाच्या घरी जाता आले आहे.
12 एप्रिल रोजी जुहू पोलीस ठाण्यातला फोन खणाणला आणि एक वृद्धा व्ही. एम. जंक्शन येथे फुटपाथवर झोपलेली असून त्यांना मदतीची आवश्यकता असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. याची तत्काळ गंभीर दखल घेत वरिष्ठ निरीक्षक शशिकांत माने व पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष ढवळे यांनी आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी धाव घेतली. मग पोलिसांनी त्या वृद्धेला गाडीतून पोलीस ठाण्यात आणले. पण त्या महिलेला शांती पटेल या आपल्या नावाशिवाय दुसरे काहीच सांगता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना शोधायचे कसे, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला.पण पोलिसांनी खच खाल्ली नाही. शांती पटेल यांची प्रकृती खूपच खराब असल्याने पोलिसांनी त्यांना आधी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर ढवळे यांनी व्हॉटस्अॅपवरील विविध ग्रूपमध्ये शांती पटेल यांचा फोटो फिरवून कोणी ओळखत असल्यास आपल्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले. शिवाय वेगवेगळय़ा संस्था, मंडळांच्या माध्यमातूनदेखील शांती पटेल यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. दरम्यान, सचिन नावाच्या व्यक्तीने ढवळे यांना संपर्क साधून शांती पटेल यांचा भाचा शंकर पटेल याचा नंबर दिला. 15 दिवसांनंतर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. पोलिसांनी शंकर पटेल याला शांती पटेल यांच्याबाबत सांगताच त्याने ती माझी आत्या असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करून शांती पटेल यांना शंकरच्या ताब्यात देण्यात आले.
…म्हणून त्या भरकटल्या
75 वर्षीय शांती पटेल यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांना अपत्य नाही. त्यामुळे त्या कधी साकीनाका येथे भावाकडे तर कधी जुहू येथील बहिणीकडे राहतात. पण त्या दोघा भावाबहिणीमध्ये वाद आहे. त्या दिवशी शांती पटेल या साकीनाका येथून जुहूत राहणाऱया बहिणीकडे राहण्यासाठी निघाल्या होत्या; पण ही बाब ना भावाला माहिती होती ना जुहूतल्या बहिणीला. त्यातच मिलन सबवे येथे येताच त्या पत्ता विसरल्या. त्यामुळे रिक्षाचालकाने शांती पटेल यांना व्ही.एम. जंक्शन येथे सोडले. त्या सर्वच विसरल्याने त्यांना काहीच करता आले नाही आणि त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती; पण जुहू पोलीस देवदूतासारखे धावून आले आणि कोरोनाच्या संकटात पोलिसांनी शांती पटेल यांना मदतीचा हात दिला.





























































