लोकसंस्कृती – भारूड मंदिरातील ‘निरंजन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

भारूडरत्न निरंजन भाकरे कोरोना जनजागृती करीत होते. देहदानाचा संकल्प त्यांनी सोडला होता. कोरोनाने निधन झाल्याने त्यांचा हा संकल्प सिद्धीस गेला नाही. त्यांच्या अकाली निधनाने भक्ती संप्रदायचा आणि लोकसंप्रदायाचा मांडव जणू सुना झाला आहे. टाळ, मृदंग आणि अभंगही जणू मुके झाले आहेत.

भारूडरत्न’ निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांसाठी आणि भक्तभाविकासांठी ही बातमी धक्कादायक होती. कोरोना जनजागृती प्रचार मी भारूडाद्वारे करीत आहे. सर जी तुमचे आशीर्वाद असू द्या, असे पंधरा दिवसांपूर्वी निरंजन भाकरे यांनी मोबाईलवरून बोलताना मला सांगितले. अलीकडेच संभाजीनगरच्या एम. जी. एम स्वयं अर्थसहाय्यित लोकसाहित्य-लोककलेच्या अभ्यास मंडळावर भाकरे यांची नियुक्ती झाली होती. या अभ्यास मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी बैठकीत संबोधित करीत असताना भाकरे त्या बैठकीला उपस्थित होते.

भारूडाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करत असतानाच तोच कोरोना भारूडकार निरंजन भाकरे यांच्या मृत्यूचे कारण बनला. त्यामुळे लोककलेतील बुरगुंडाला महाराष्ट्र कायमचा मुकला आहे. निरंजन भाकरे यांचा जन्म 10 जून 1965 रोजी संभाजीनगर जिह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद नावाच्या छोटय़ाशा खेडय़ात झाला. त्यांचे वडील मुरलीधर शिंपी शिवणकाम करीत. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. भाकरेंना आपल्या वडिलांकडूनच भजनाची परंपरा लाभली. वारकरी संप्रदायाचे संस्कार भाकरे यांच्यावर होते. मराठवाडा ही संतांची भूमी, संत एकनाथांच्या पैठणमध्ये प्रभाकर देशमुख यांनी भारूडाचा वारसा चालवीत देशभर नाव केले त्याच मराठवाडय़ाच्या भूमीत निरंजन भाकरे नावाचे ‘भारूडरत्न’ अवघ्या महाराष्ट्राला मिळाले. शालेय शिक्षण झाल्यावर पुढे संभाजीनगर येथे एमआयडीसीमध्ये लुपीन या औषधनिर्मिती कंपनीत ते कामाला लागले. पुढे भजन, भारूड, पोवाडे गाता गाता इंडियन नॅशनल थिएटर लोकप्रयोज्य कला संशोधन केंद्राचे संचालक अशोकजी परांजपे यांचे मार्गदर्शन निरंजन भाकरे यांना लाभले. आयएनटीतर्फे भाकरे यांच्या भारूडाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला. त्यानंतर लोकरंग संस्थेतर्फे लोकोत्सवमध्ये निरंजन भाकरे यांच्या भारूडाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून भाकरे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. आपल्या आयुष्यात तीन अशोक व्यक्तींचे मोठे योगदान आहे. अशोकजी परांजपे, अशोक हांडे आणि अशोक पत्की यांनी आपल्या भारूड कलेला पैलू पाडले असे निरंजन भाकरे मोठय़ा अभिमानाने सांगत.

निरंजन यांनी ‘सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा’, ‘धिन धिना धिन धा’, ‘ट्रिक्स मिक्स रिमिक्स’, ‘दम दमा दमा’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अशा विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमात भाग घेतला. डोंबिवली येथे आयोजित झालेले अखिल भारतीय नाटय़ संमेलन, ठाणे येथे आयोजित झालेले अखिल भारतीय साहित्य संमेलन, ठाणे येथे आयोजित झालेले अखिल भारतीय नाटय़ संमेलन, बेळगाव येथे आयोजित झालेले अखिल भारतीय नाटय़ संमेलन, पर्यावरण विभागाचा महाराष्ट्र महोत्सव अशा अनेक मोठय़ा संमेलनांमध्ये लोकरंग सांस्कृतिक मंच या संस्थेतर्फे आयोजित झालेल्या कार्यक्रमांमध्ये भाकरे यांच्या भारूड सादरीकरणाची प्रचीती रसिकांनी घेतली होती. शैला खांडगे यांनी लिहलेल्या ‘अंतरीचे धावें’ या पुस्तकात निरंजन भाकरे यांच्या कार्यकर्तृत्वावर स्वतंत्र लेख आहे.

‘बुरगुंडा होईल बया गं… तुला बुरगुंडा होईल…’ हे भारूड सादर करताना भाकरे यांचा अभिनय, त्यांचे गायन आणि त्यांचे निरूपण असा त्रिवेणी संगम घडत असे. ‘बाई ग! तुझ्या डोक्यावरील केसांचा अँटिना, तू ब्युटीपार्लरमध्ये जाऊन कापून आल्यामुळे तुझ्या मेंदूरूपी प्रक्षेपणात मुंग्या निर्माण झाल्या’ असे ते मोठय़ा मार्मिकपणे सांगत. बुरगुंडा सादर करताना काखेतील बाहुली मिरवत मिरवत ते म्हणायचे, ‘‘बायांनो, लहानपणी मुलाच्या तोंडात दुधाची बाटली काsंबल्यावर पुढे मुलं मोठं झाल्यावर दारूची बाटलीचं तोंडाला लावणार. फिगरची पर्वा करू नका, मुलांना नैसर्गिक मातृत्वाचं दूध द्या ’’…असे भाकरे आपल्या भारूडातून सांगत. ते आध्यात्मिक उद्बोधनासोबतच समाजप्रबोधनाचे अंजन रसिकांच्या डोळ्यात घालत असत. ‘शंकराचा नंदी आला, महादेवाचा नंदी आला’ हे भारूड सांगताना ते कृषी संस्कृतीचा उदो उदो करीत आणि पर्यावरणाचा संदेश देत. संत एकनाथांचे अध्यात्म आणि संत गाडगे महाराजांची समाज प्रबोधनाची शैली यांचा सुंदर मिलाप म्हणजे निरंजन भाकरे यांचे भारूड… भारूडाची समर्थ परंपरा महाराष्ट्रात पुण्याचे डॉ. रामचंद्र देखणे, पैठणचे प्रभाकर देशमुख, पंढरपूरच्या चंदाबाई तिवाडी, अकलूज इंदापूरकडचे लक्ष्मण राव राजगुरू, नगरचे हमीद सय्य्यद, डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. मोनिका ठक्कर, योगेश चिकटगावकर आदींनी समर्थपणे सांभाळली आहे. निरंजन भाकरे या भारूडरत्न मालिकेतील पंठमणी होते.

z [email protected]
(लेखक लोककलेचे अभ्यासक आहेत)