वास्तववादी प्रतिभेला मानवंदना, सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी जीवनाचं वास्तववादी दर्शन घडवणारे पहिले सिनेनिर्माता, दिग्दर्शक सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्ष 2 मेपासून सुरू होत आहे. यानिमित्त देशविदेशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सत्यजित रे यांना मानवंदना देण्यात येणार आहे. सध्याचे कोरोनाचे संकट बघता सर्व कार्यक्रम डिजिटल आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांचा मेळ घालून वर्षभर साजरे केले जाणार आहेत.

सत्यजित रे यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी माहिती प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय, फिल्म डिव्हिजन, एनएफडीसी, एनएफएआय आणि कोलकात्याची सत्यजित रे फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था या सर्व विभागांनी पुढाकार घेतला आहे. देश-विदेशात सत्यजित रे चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. यात रे यांनी तयार केलेले तसेच त्यांच्यावरील चित्रपट, माहितीपट दाखवण्यात येतील. कान्स चित्रपट महोत्सव आणि इफ्फीमध्येही विशेष कार्यक्रम होईल.

सत्यजित रे यांचा जन्म 2 मे 1921 रोजी झाला. ते ख्यातनाम सिनेनिर्माता असण्याबरोबरच सिद्धहस्त लेखक, कल्पक रेखाटनकार, सृजनशील ग्राफीक डिझायनर आणि निष्णात संगीतकार होते. ‘पथेर पांचाली’ या पहिल्या सिनेमाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता चारुलता, आगंतुक आणि नायक असे एकापेक्षा एक सरस सिनेमा तयार केले. या सृजनशील लेखकाने जन्माला घातलेले गुप्तहेर ‘फेलुदा’ आणि शास्त्रज्ञ प्रोफेसर शोंपू बंगाली साहित्यात प्रसिद्ध झाले. हिंदुस्थान सरकारने 1992 साली भारतरत्न या सर्वेच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव केला.

जन्मशताब्दीनिमित्त फिल्म डिव्हिजन, मुंबईच्या संग्रहालयात सत्यजित रे यांना समर्पित विशेष विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष आणि डिजिटल माध्यमातून रे यांच्या जीवनातील तसेच चित्रपटातील प्रसंग आणि मुलाखती दाखवल्या जाणार आहेत.

‘एनएफएआय’च्या वतीने रे यांच्या साहित्याचे पुनरुज्जीवन आणि डिजिटायझेशन केले जाणार आहे. कोलकात्याची सत्यजित रे फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था त्यांच्या आवारात रे यांच्या शिल्पाचे अनावरण करणार आहेत.

‘जीवनगौरव’ पुरस्कार

चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी सत्यजित रे ‘जीवनगौरव’ पुरस्काराची मुहूर्तमेढ या वर्षी रोवण्यात आली आहे. ‘इफ्फी’मध्ये दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 10 लाख रुपये, प्रमाणपत्र, रजतमयूर आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.