
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधकाम कामगारांसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रिय 13 लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण पद्धतीने (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार आजपर्यंत 11 लाख 10 हजार 929 नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे, अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
30 एप्रिल अखेर 166 कोटी 63 लाख 93 हजार 500 रुपयांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने कष्टकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीही कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव कालावधीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्यात आली होती, असे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 15 मेपर्यंत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगारवर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नाहीत. त्यामुळे कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदीत कामगारांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरू असून कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

























































