
केरळमध्ये 40 वर्षांनंतर इतिहास घडला आहे. सलग दुसऱयांदा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील ‘एलडीएफ’ ही डाव्या पक्षांची आघाडी दोन तृतीयांश जागा मिळवित सत्तेवर आली आहे. दरम्यान, कोरोना महामारीत विजयन सरकारने केलेल्या नियोजनबद्ध कामाला केरळच्या जनतेने पसंतीची मोहोर उमटविली आहे.
केरळमध्ये आजपर्यंत ‘एलडीएफ’ किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूडीएफ’ या आघाडीची आलटून पालटून सत्ता आली आहे. पण सलग दुसऱयांदा सत्ता मिळविण्याचा विक्रम ‘एलडीएफ’ने यावेळी केला.
दणदणीत बहुमत
केरळ विधानसभेच्या 140 जागांमध्ये बहुमतासाठी 79 जागा मिळणे गरजेचे आहे. मात्र ‘एलडीएफ’ला 91 जागा मिळाल्या आहेत. दणदणीत बहुमत डाव्या आघाडीने मिळविले.
‘एलडीएफ’ या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये माकपला 59, भाकप 16, केसी(एम) या पक्षाला 4 जागा मिळाल्या आहेत.
‘यूडीएफ’ या युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटमधील काँग्रेस पक्षाला 25, आययूएमएल पक्षाला 17 आणि केसीला 2 जागा मिळाल्या.
‘एलडीएफ’ला 91 तर ‘यूडीएफ’ला 39 जागा मिळाल्या. अपक्ष व इतर 9 जागांवर विजयी झाले आहेत.
मेट्रोमॅन श्रीधरन पराभूत; आरोग्यमंत्री शैलजा विजयी
केरळच्या जनतेने पुन्हा भाजपचा दारुण पराभव केला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला अवघी एक जागा मिळाली होती. यावेळी दोन मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव झाला. तसेच 88 वर्षांचे मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनाही केरळच्या जनतेने नाकारले. दुसरीकडे कोरोनाकाळात सातत्याने कार्यरत असलेल्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांचा मोठा विजय झाला आहे.


























































