…म्हणून फक्त मेडीकलमध्ये करत होते चोरी; घरफोडी करणाऱ्या तडीपारासह साथीदाराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाउनमध्ये इतर दुकाने बंद असल्यामुळे चोरी करूनही उपयोग नव्हता. मात्र, या काळात मेडीकल दुकानांचा धंदा चांगला असल्यामुळे सेंट्रल लॉक नसलेल्या मेडीकलची माहिती काढून चोरी करणाऱ्या तडीपारासह साथीदाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोकडसह 2 लाख 3 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सूरज उर्फ पाप्या रमेश जाधव (वय 21, रा. काशेवाडी, भवानी पेठ ) आणि रोहन सुभाष गायकवाड (वय 22, रा. भवानी पेठ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 एप्रिलला मेडीकलचे शटर उचकटून चोरी झाली होती. याप्रकरणी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांना तडीपारासह त्याच्या साथीदाराने चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तडीपार सुरज उर्फ पाप्या आणि रोहनला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, रमेश गरूड, पृथ्वीराज पांडुळे, अभिजीत रत्नपारखी, सुशील धिवार यांच्या पथकाने केली.