
राज्यात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. नगर शहरात महापालिकेच्या पाच आरोग्य केंद्रांवर लसीकरण होत असून, शहरासाठी 10 हजार डोस प्राप्त झाले आहेत. शनिवारी या पाच लसीकरण केंद्रांवर दुपारी दोन ते पाच यावेळेत 954, तर रविवारी 1 हजार 233 तरुणांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला. दरम्यान, अद्यापि ग्रामीण भागातील तरुणांना लस देण्याबाबत सरकारकडून आरोग्य विभागाला सूचना नाहीत.
केंद्र सरकारच्या घोषणेनुसार 1 मेपासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील तरुणांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. नगर शहरातील पाच लसीकरण केंद्रांवर दोन दिवसांत 2 हजार 187 जणांना या वयोगटातील तरुणांना पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर आरोग्य सेतू ऍपवर नोंदणी केलेल्या तरुणांनी रविवारी नगरमध्ये लस घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र सर्वच आरोग्य केंद्रावर दिसले.
नगर शहरात सुरू असणाऱया लसीकरणासाठी दहा हजार लसचा साठा आला असून, त्याद्वारे हे लसीकरण सुरू आहे. मात्र, 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी असणारा जिल्हा परिषदेकडील लसीचा साठा संपला आहे. सरकारी पातळीवरून साठा आल्यानंतर तिचे जिह्यात वितरण करण्यात येणार आहे. यामुळे आज जिह्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत शिल्लक साठय़ातून लसीकरण होणार आहे. हा साठा संपल्यानंतर व लस आल्यानंतर ग्रामीण भागात लसीकरण सुरू होऊ शकणार आहे.































































