
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विक्रम भावे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज मंजूर केला. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हायकोर्टाने भावे याची सुटका केली.
दाभोळकरांची ओळख पटवण्यात व त्यांच्या हत्येवेळी खुनासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल नष्ट करण्यात विक्रम भावेने सहभाग घेतल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी गेल्या वर्षी मे महिन्यात त्याला अटक केली होती. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे भावेने हायकोर्टात अपील केले त्यावर आज न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. हायकोर्टाने त्याचा जामीन अर्ज मंजूर करतानाच त्याला अनेक अटी घातल्या. भावेने पासपोर्ट सीबीआयकडे जमा करावा. पुण्यातील विशेष न्यायालयाच्या हद्दीतच रहावे आणि सत्र न्यायालयात पहिल्या एक महिन्यात दररोज, पुढच्या दोन महिन्यांत आठवडय़ातून दोन दिवस आणि त्यानंतर खटला संपेपर्यंत आठवडय़ातून एकदा हजेरी लावावी. साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नये, पीडितांच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारे संपर्क करू नये व पुराव्यांशी छेडछाड करू नये. व इतर अटी घालण्यात आल्या आहेत. यापैकी एकाही अटीचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होईल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.


























































