
औष्णिक वीज प्रकल्पांमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याने महावितरणने सौर ऊर्जेला पसंती दिली आहे. आतापर्यंत 3 हजार 428 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसोबत वीज खरेदी करार केलेले असतानाही पर्यावरणपूरक विजेचा वापर वाढवा म्हणून राज्य किंवा केंद्रीय वीज ग्रीडशी जोडलेल्या सौर प्रकल्पातून आणखी पाचशे मेगावॅट विजेच्या खरेदीसाठी टेंडर मागवले आहे. 25 वर्षासाठी हा वीज खरेदी करार केला जाणार आहे.
महावितरणने आतापर्यंत जवळपास 35 हजार मार्गवॅट विजेच्या खरेदीसाठी औष्णिक, जलविद्युत, सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांसोबत वीज खरेदी केले असून त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण औष्णिक वीज प्रकल्पांचे आहे. मात्र औष्णिक वीज प्रकल्पातून वीज निर्मिती करताना कोळसा जाळावा लागत असल्याने मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. त्याची दखल घेत केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभागाने पावणे दोन लाख मेगावॅटचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच महाराष्ट्र वीज नियामक अयोगानेही 2022 पर्यंत वीज वितरण कंपन्यांनी आपल्या एकूण वीज वितरणाच्या 14 टक्के वीज सौर किंवा पवन ऊर्जा प्रकल्पातून घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळेच महावितरणने सौर ऊर्जेची उपलब्धता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा आणि आवाडाकडून 350 मेगावॅट वीज मिळणार
महावितरणने याआधी 500 मेगावॅट सौर ऊर्जेच्या खरेदीसाठी टेंडर मागवले होते. त्यानुसार टाटा पॉवरने 250 मेगावॅट तर आवाडा एनर्जीने 100 मेगावॅट विजेचा पुरवठा करण्याबाबत करार केला आहे. सदर वीज सुमारे पावणे तीन रुपये प्रतियुनिट दराने महावितरणला मिळणार आहे.


























































