
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व जिल्हा प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. उपकेंद्र स्तरावर लसीकरण व्हावे यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
उदय सामंत म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास उपाययोजना म्हणून लहान मुलांसाठी स्वस्तिक हॉस्पिटल येथे स्वतंत्र डेडीकेटेड कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी घरगुती वातावरणात लहान मुलांना उपचार देण्यात येतील. तसेच स्तनदा मातांसाठीही स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ऑक्सीजनचे प्रमाण कमी पडू नये म्हणून रायगडवरुन 10 टन व 5 टनचे टँकर रत्नागिरीकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत. आगामी महिनाभरात रत्नागिरी जिल्हा ऑक्सीजनने स्वयंपूर्ण असेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात नव्याने 60 बेडची सुविधा तसेच महिला रुग्णालयात 130 ते 140 बेडची व्यवस्था करुन देत आहोत. बोगस ई पास प्रकरणाकडे आम्ही गांभिर्याने पाहात असून बोगस पास बनवणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे सामंत यांनी सांगितले.































































