
भायखळा येथील दगडी चाळीत लवकरच म्हाडातर्फे दोन 40 मजली टॉवर उभारण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी दिली. यात दगडी चाळींतील सर्व 10 इमारतींचा समावेश आहे. यात मूळ भाडेकरूंसाठी घरे असणार असून उर्वारित घरे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.
सध्या दगडी चाळीतील 8 इमारती या अरुण गवळीच्या मालकीच्या आहेत, तर इतर दोन इतारती या त्याच्या कुटुंबीयांनी विकत घेतल्या आहेत. त्यांनी पुनर्विकासासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठविला होता. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर म्हाडाकडून अखेर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
सध्या पुनर्विकासासाठी लवकरच बिल्डरला ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तर भाडेकरूंसाठी इरादा पत्रदेखील मंजूर झाले असून तत्पूर्वी एमबीआरआरबी पात्र भाडेकरूंची यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती विनोद घोसाळकर यांनी यावेळी दिली. सध्या या ठिकाणी 338 भाडेकरू आहेत.





























































