
विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून राज्य मंत्रिमंडळाने 12 जणांच्या नावांची शिफारस करूनही याकडे दुर्लक्ष करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. सहा महिने उलटूनही विधान परिषदेवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती अद्याप का झाली नाही असे खडसावत हायकोर्टाने राज्यपालांना जाब विचारला. एवढेच नव्हे तर, राज्यपालांच्या सचिवांना या प्रकरणात प्रतिवादी करण्याची याचिकाकर्त्याना मुभा देत शासनाला या प्रकरणी दोन आठवडय़ात उत्तर देण्याचे आदेश दिले.
विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्य हे सरकारने शिफारस केलेले असतात. राज्य सरकारने 12 जणांच्या नावांची शिफारस केली असून ती नावे राज्यपालांकडे 6 नोव्हेंबर 2020 रोजी पाठवली आहेत. मात्र असे असताना राज्यपालांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याने नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते रतन सोली लुथ यांनी ऍड. गौरव श्रीवास्तव यांच्यामार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली असून या याचिकेकर आज न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी कोर्टाला बिहार राज्याचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की तेथील विधानसभेने राज्यपालांना यादी पाठवल्यानंतर राज्यपालांनी 24 तासात नावे जाहीर केली होती. श्रीवास्तव यांनी याचिकेत म्हटले आहे की परिच्छेद 171(5) नुसार राज्यपालांना या बाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. पण राज्यपालांचे हे कृत्य घटनात्मक लोकशाहीच्या तत्त्वांचे आणि संविधानाचे उल्लंघन करणारे आहे. तसेच मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल नामनिर्देशित नावे सादर करण्यात अपयशी ठरले आहेत. हायकोर्टाने याचिकेची गंभीर दखल घेत राज्यपालांना दिरंगाईबाबत फटकारले.
राज्य मंत्रिमंडळाने 6 नोव्हेंबर 2020 रोजी 12 जणांच्या नावांची शिफारस केली असतानाही राज्यपालांनी या प्रकरणी अजून निर्णय का घेतला नाही?
- न्यायमूर्ती म्हणाले मंत्रिमंडळाच्या शिफारशीप्रमाणे नियुक्त्ॊयांबाबत निर्णय का होत नाही? राज्यपालांनी काही तरी निर्णय घ्यायला हवा, राज्यपाल निर्णय घेण्यास बांधील असतानाही ते निर्णय का घेत नाही? त्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकार व अन्य प्रतिवादींना दोन आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर राज्यपालांच्या सचिवांना याचिकेत प्रतिवादी करण्याची याचिकाकर्त्यांना मुभा देत सुनावणी 9 जूनपर्यंत तहकूब केली.


























































