
गेले काही दिवस टूलकिटवरून भाजप–काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. कथित बदनामीकारक टूलकिटच्या माध्यमातून काँग्रेसला घेरणाऱया भाजपचे प्रवत्ते संबित पात्रा यांना शुक्रवारी ट्विटरने मोठा झटका दिला. पात्रा यांनी काँग्रेससंबंधी फेरफार केलेला मजकूर ट्विट केल्याचा शेरा ट्विटरने मारला आहे. या कारवाईमुळे पात्रा यांचा खोटेपणा उजेडात आला असून टूलकिट प्रकरण भाजपच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत.
संबित पात्रा यांनी 18 मे रोजी ट्विट करीत एक फोटो शेअर केला होता. मित्रांनो, महामारीदरम्यान गरजूंना मदत करण्यासंबंधित काँग्रेसच्या एका टूलकिटवर नजर टाका. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय. पत्रकारमित्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारविरुद्ध वातावरण तापवले जातेय. ही त्याचीच यादी आहे, असा दावा पात्रा यांनी केला होता. हा दावा काँग्रेसने फेटाळून लावला होता. त्यानंतर ट्विटरने पात्रा यांच्या ट्विटवर ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’चे लेबल मारून त्यांच्या खोटय़ा दाव्याचे पितळ उघडे पाडले आहे. पात्रा व इतर भाजप नेत्यांनी टूलकिटवरून काँग्रेसवर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल सुरू ठेवला होता. त्यामुळे गेले काही दिवस भाजप आणि काँग्रेस यांच्यात टूलकिट वाद चिघळला आहे. याचदरम्यान ट्विटरने पात्रा यांच्यावर कारवाई करून भाजपला मोठी चपराक लगावली आहे. ट्विटमध्ये कुठल्याही स्त्रोताशिवाय आरोप केला असेल व ती माहिती चुकीची आढळली तर ट्विटरकडून संबंधित व्हिडीओ, ट्विट, फोटो वा मजकुरावर ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ लेबलची कारवाई केली जाते.
कॉंग्रेसने केली होती कारवाईची मागणी
भाजपकडून समाजात चुकीची माहिती आणि अशांततेचे वातावरण पसरवले जात आहे. याप्रकरणी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यासह इतर भाजप नेत्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी काँग्रेसने गुरुवारी ट्विटरकडे केली होती. भाजपने कथित टूलकिटसंबंधी शेअर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे काँग्रेसने म्हटले होते.
भाजप नेत्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
काँग्रेसने संबित पात्रा, जे. पी. नड्डा यांच्याविरोधात एफआरआय नोंदवण्याची मागणी करीत दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले होते. तसेच काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने संबित पात्रा आणि छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.





























































