
>> प्रसाद ताम्हनकर
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचीच एक शाखा म्हणजे ‘मशीन लर्निंग’ होय. वैद्यकीय क्षेत्रासाठी हे ‘मशीन लर्निंग’ म्हणजे तर ’गेम चेंजर’ ठरू लागले आहे. विविध रोगांवर उपचार शोधण्यासाठी, रोगांची कारणे शोधण्यासाठी, विविध प्रकारच्या विषाणू आणि जीवाणूंचा अभ्यास करण्यासाठी या ‘मशीन लर्निंग’ तंत्रज्ञानाची अत्यंत बहुमूल्य अशी मदत वैद्यकीय क्षेत्राला मिळते आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्स (Artificial Intelligence – AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सध्या जगात अनेक शाखांमध्ये केला जात आहे. उत्पादनापासून ते शिक्षणापर्यंत अनेक ठिकाणी ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी अत्यंत उपयोगी ठरते आहे. एखाद्या घराचे डिझाईन बनवण्यापासून ते एखाद्या नैसर्गिक आपत्तीची कल्पना; ती येण्याच्या आधीच मानवापर्यंत पोहोचवण्यासारखी अनेक स्वप्नवत कार्य या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सध्या सहज शक्य होत आहेत.
आता हेच ‘मशीन लर्निंग’ तंत्रज्ञान मानवाच्या आयुष्यासाठी आणखी एक उपयोगी तंत्र विकसित करण्यात यशस्वी झाले आहे. आता ‘मशिन लर्निंग’च्या मदतीने एखाद्या मनुष्याला येऊ शकणाऱया हृदयविकाराच्या झटक्याचा आगाऊ अंदाज बांधणे शक्य होणार आहे. जेव्हा हृदयाची धडधड अचानक थांबते तेव्हा वेळ आणि हवामान यासंदर्भातील उपलब्ध अशा सर्व माहितीची सांगड घालून हे तंत्रज्ञान हृदयविकाराच्या झटक्यासंदर्भात अंदाज देते. ‘मशीन लर्निंग’ तंत्रज्ञान म्हणजे संगणकाच्या अल्गोरिदमचाच अभ्यास आहे. यामध्ये उपलब्ध असलेल्या माहिती आणि नमुन्यांचा अभ्यास करून कमीत कमी वेळात अचूक निर्णय घेणे शक्य होते. तसेच या माहिती आणि नमुन्यांमध्ये सतत नवीन भर पडत असल्याने त्यांचा अभ्यास करत हे तंत्रज्ञान अधिक अचूक आणि प्रगल्भ बनण्यास मदत होते.
या तंत्रज्ञानाने केलेल्या अभ्यासानुसार रविवार, सोमवार, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणि तापमानात अचानक घट झाल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक आढळते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता मानवाला येणाऱया धोक्याची पूर्वसूचना तर मिळू शकेलच, पण ऐनवेळी वैद्यकीय मदतीसाठी करावी लागणारी धावपळदेखील वाचणार आहे. योग्य ती खबरदारी घेता येणार असल्याने मानवी आयुष्याची सुरक्षिततादेखील अधिक वाढणार आहे.
दुसरीकडे अर्धांगवायू झालेल्या अनेक रुग्णांना वरदान ठरेल असे एक अनोखे यश वैद्यकीय क्षेत्राने मिळवले आहे. अर्धांगवायूने मानेखालील संपूर्ण शरीर लुळे पडलेल्या एका रुग्णावर केलेल्या प्रयोगाद्वारे त्याने विचारात आणलेली अक्षरे अथवा शब्द संगणकाच्या पडद्यावर उमटविण्यात तंत्रज्ञानाद्वारे यश मिळवण्यात आले आहे. आता अशा दुर्धर रोगाने आजारी असलेले अनेक रुग्ण सहजतेने इतरांशी संवाद साधू शकणार आहेत. या तंत्रज्ञानाने त्यांच्या आयुष्यात जणू एक नवीन पहाटच आणलेली आहे. संशोधकांनी केलेल्या या प्रयोगात मानेखालील संपूर्ण अंग लुळे पडलेल्या एका 65 वर्षीयो रुग्णाच्या मेंदूच्या पृष्ठभागावर दोन लहानसे इलेक्ट्रोड ग्रीड बसविण्यात आले. या इलेक्ट्रोडच्या मदतीने मेंदूच्या विशिष्ट भागाच्या विद्युत लहरी वाचण्यात आल्या. मेंदूच्या या विशिष्ट भागाद्वारे हात आणि बोटांच्या हालचालींचे नियंत्रण करण्यात येते. त्यानंतर या संशोधनात भाग घेतलेल्या रुग्णाने मनात आणलेले काही शब्द आणि अक्षरे आपण हाताच्या बोटांनी लिहीत आहोत अशी कल्पना केली. त्यानंतर संशोधकांनी अल्गोरिदमच्या मदतीने त्या रुग्णाने विचारात आणलेल्या प्रत्येक अक्षराचा नैसर्गिक पॅटर्न समजून घेतला आणि त्या पॅटर्नला मग अक्षराचा रूपात संगणकाच्या पडद्यावर उतरवण्यात ते यशस्वी झाले. या रुग्णाने प्रतिमिनिट 90 अक्षरे अथवा 15 शब्द आपल्या मनात योजले होते असे संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. मनात कल्पिलेल्या या अक्षरांचा पडद्यावर उतरण्याचा वेग हा साधारण या रुग्णाच्या वयाच्या म्हणजे 65 वर्षे वयाच्या कोणत्याही माणसाच्या स्मार्टफोनवर टाइप करण्याच्या वेगाशी बरोबरी करणारा होता. अर्थात हे तंत्रज्ञान अजून बाल्यावस्थेत असून त्याला अजूनही बरेच विकसित होण्याची गरज आहे आणि त्यासाठी अधिकाधिक रुग्णांना यात सहभागी करून त्यांच्या चाचण्यांची मदत या विकासासाठी घेण्यात येणार आहे.





























































