
अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने आपल्या अंतराळ मोहिमांना वेग दिला आहे. त्यातून नवनवीन रहस्यांचा उलगडा करण्याचा निर्धार नासाने केला आहे. नुकतेच नासाने 270 किलोमीटर उंचीवरून क्युरियोसिटी रोव्हरचे छायाचित्र टिपले आहे. मंगळावरच्या डोंगरावर चढाई करणाऱया रोव्हरचा व्हिडियो बघून थक्क व्हायला होतंय.
मंगळावर 2014पासून क्युरियोसिटी रोव्हर माऊंट शार्पवर चढाई करत आहे. मार्चच्या सुरुवातीच्या काळात क्युरियोसिटीने माँट माका&sवर चढाई सुरू केली. या मोहिमेत या रोव्हरने मंगळावर जीवसृष्टी असल्याच्या दृष्टीने काही पुरावे देण्यात यश मिळवले. येत्या काही वर्षांत मंगळ ग्रहावरील आणखी काही रहस्यांचा उलगडा होणार असल्याचे संकेत आहेत. क्युरियोसिटी मंगळाच्या भूतकाळाविषयी अधिक रहस्यांचा उलगडा करू शकेल, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
मिठाचा शोध दृष्टीपथात
क्युरियोसिटी रोव्हर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर मीठ शोधण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. रोव्हरद्वारे टिपण्यात आलेली छायाचित्रे आणि डेटाचा सखोल अभ्यास करून मंगळावर जीवन होते की नाही हे समजेल. मंगळावर सेंद्रीय आणि कार्बनयुक्त मीठ अस्तित्वात असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे.


























































